शब्दसरींमध्ये चिंब भिजवणारी ‘लोकमत काव्यॠतू’ मैफल रविवारी रंगणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 14:37 IST2022-08-19T14:37:40+5:302022-08-19T14:37:49+5:30
युवराज ढमाले कॉर्प प्रस्तुत लोकमान्य कॉ. सोसायटी व सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्टिट्यूटच्या सहयोगाने मैफल येत्या २१ ऑगस्ट रोजी रंगणार

शब्दसरींमध्ये चिंब भिजवणारी ‘लोकमत काव्यॠतू’ मैफल रविवारी रंगणार
पुणे : ‘पाऊस दाटलेला, माझ्या घरावरी हा, दारास भास आता, हळूवार पावलांचा’’....कवी सौमित्रचे मनावर रुंजी घालणारे हे शब्द. प्रत्येक ॠतुंशी शब्दांचं एक हळुवार नातं असतं. पावसाचं एकाचवेळी परसात आणि मनात बरसणं हा अनुभव तसा विलक्षणंच ! मेघांच्या वर्षावाबरोबरच शब्दसरींंमध्ये चिंब भिजण्यासाठी लोकमत ‘काव्यॠतू’ ही अनोखी मैफल घेऊन रसिकांच्या भेटीला येत आहे. नवोदितांपासून नामवंतांपर्यंतच्या काव्यप्रतिभेचा उत्कट आविष्कार या एकाच व्यासपीठावर अनुभवायला मिळणार आहे.
“लोकमत डॉट कॉम“ आयोजित आणि युवराज ढमाले कॉर्प प्रस्तुत लोकमान्य कॉ.सोसायटी व सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सहयोगाने ‘काव्यॠतू’ ही मुलखावेगळी मैफल येत्या रविवारी (दि. २१) सायंकाळी ४ वाजता सेनापती बापट रस्त्यावरील जे. डब्लू. मॅरियट येथे रंगणार आहे. या कविसंमेलनात महाराष्ट्रातील नवे-जुने दमदार कवी, कवयित्री आणि गझलकारही सहभागी होणार आहेत. अगदी हलक्या फुलक्या कवितांपासून राजकीय स्थितीवर भाष्य करणाऱ्या, वेदनेतून काळजाचा वेध घेणाऱ्या, ओठांवर हास्यरेषा उमटविणाऱ्या अशा एकेक काव्यसरींमधून शब्दांचं आभाळ रितं होणार आहे.
शब्दांच्या या खुल्या अवकाशाची अनोखी सफर रसिकांना घडणार आहे. आपल्या काव्यप्रतिभेतून महाराष्ट्रातील रसिकांना शब्दांचं लेणं बहाल करणारे आणि कवितेच्या प्रांतात लीलया विहार करणारे असे ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे, कवी सौमित्र उर्फ किशोर कदम, प्रसिद्ध कवी बंडा जोशी, भरत दौंडकर, ज्ञानेश्वर वाकुडकर, ज्योत्स्ना रजपूत, जुई कुलकर्णी, इंद्रजित घुले, राधिका प्रेमसंस्कार, स्वाती शुक्ल आणि गुंजन पाटील यांची ही काव्यमैफल रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. चला तर मग ही ‘काव्यॠतू’ मैफल अनुभवूयात!