पुणे - मराठा साम्राज्याचे शौर्य आणि पराक्रम यांचे प्रतीक ठरलेल्या थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण आज पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले. गुरुवारी रात्री अमित शाह पुण्यात दाखल झाले होते. आज सकाळी ११:३५ वाजता पार पडलेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहोचला नाही, याला इंग्रजांसह काही स्वकीयही जबाबदार आहेत. त्यामुळे मोगलांनंतर थेट इंग्रज आपल्यावर राज्य करत असल्याचे लोकांना वाटते, असे त्यांनी नमूद केले. तसेच थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या युद्धनीतीची उदाहरणे देत त्यांनी बाजीरावांचे कार्य गौरवले. पुतळा एनडीएमध्ये उभारणे हे अत्यंत योग्य असून, या ठिकाणापेक्षा दुसरे चांगले स्थान असू शकत नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील आपल्या भाषणात पुण्याच्या भूमीला वंदन करत, “१७व्या शतकात पेशव्यांनी इथूनच मराठा साम्राज्याचा झेंडा अटकेपार नेला,” असे सांगितले. एनडीए हे देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे प्रशिक्षण केंद्र असल्याने अशा पवित्र जागी बाजीराव पेशव्यांचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणे हे उचितच असल्याचे अमित शाह यांनी नमूद केले.