पर्यटकांना शनिवारवाड्याचा इतिहास "डिजिटल ऑडिओ" गाइडच्या स्वरुपात उपलब्ध होणार
By राजू हिंगे | Updated: November 19, 2023 16:01 IST2023-11-19T16:01:41+5:302023-11-19T16:01:59+5:30
“डिजिटल ऑडिओ गाइड म्हणजे “क्यु.आर.कोड’’ बसविण्यात येणार, त्यात मोबाइलमध्येच हे संभाषण डाऊनलोड करून पर्यटकांना ऐकता येणार

पर्यटकांना शनिवारवाड्याचा इतिहास "डिजिटल ऑडिओ" गाइडच्या स्वरुपात उपलब्ध होणार
पुणे : शहरातील शनिवारवाडा पाहण्यासाठी देश - विदेशातील अनेक पर्यटक येतात. शनिवारवाड्याचा इतिहास आता पर्यटकांना डिजिटल ऑडिओ गाइडच्या स्वरुपात उपलब्ध होणार आहे. यासाठी महापालिकेकडून वाडा परिसरात “डिजिटल ऑडिओ गाइड म्हणजे “क्यु.आर.कोड’’ बसविण्यात येणार आहे. त्यात मोबाइलमध्येच हे संभाषण डाऊनलोड करून पर्यटकांना ऐकता येणार आहे.
‘गुंज इंडिया’ या संस्थेकडून ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीपुढे ठेवला आहे. शहराच्या इतिहासाची साक्ष देणारा शनिवारवाडा जगभरातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. महापालिकेकडून हेरिटेज वॉकच्या माध्यमातून तसेच “लाइट अँड साऊंड शो’च्या माध्यमातून पर्यटकांना माहिती दिली जात असली तरी या दोन्ही उपक्रमांना वेळेची मर्यादा आहे. याच कारणातून पर्यटकाना “डिजिटल ऑडिओ’’ गाइड उपलब्ध करून दिला जाणार आहे.
या ऑडिओ गाइडद्वारे मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नापैकी ५० टक्के रक्कम महापालिकेस दिली जाणार असून, ५० टक्के रक्कम मे. गुंज इंडिया घेणार आहे. या “डिजिटल ऑडिओ गाइड”साठी सॉफ्टवेअर, ध्वनीसंभाषण यासाठी येणारा खर्च मे. गुंज इंडिया यांच्याकडून केला जाणार आहे. शनिवारवाड्याच्या परिसरात स्टेलनेस स्टीलमध्ये क्यू. आर. कोड लावण्यासाठीचा खर्च महापालिका करणार आहे.
...अशी असेल सुविधा
शनिवारवाडाबाहेरील परिसरात स्टेलनेस स्टीलचे क्यू. आर. कोड फलक व प्रवेशद्वाराजवळ क्यू. आर. कोड फलक बसवून पर्यटकांना ते ‘ऑनलाइन’ घेण्याची व्यवस्था असणार आहे. ध्वनीसंभाषणसह मोबाइलवर मिळणारी माहिती मराठीत ५० रुपये, हिंदी ७५ रुपये, तर इंग्लिशमध्ये १०० भरून प्राप्त होईल. विदेशी पर्यटकांनी मागणी केल्यास जर्मनी, जपानी अशा भाषांमध्येही देण्यात येणार आहे.