मुलगी पंधरा वर्षांची! कुणकुण लागताच बालविवाह रोखला; जुन्नरमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 11:00 AM2024-02-27T11:00:42+5:302024-02-27T11:01:18+5:30

जुन्नर तालुक्यात सोमवारी २६ फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वाचार वाजेच्या मुहूर्तावर ९ जणांचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता...

The girl is fifteen years old! Prevent child marriage as soon as it occurs; Incidents in Junnar | मुलगी पंधरा वर्षांची! कुणकुण लागताच बालविवाह रोखला; जुन्नरमधील घटना

मुलगी पंधरा वर्षांची! कुणकुण लागताच बालविवाह रोखला; जुन्नरमधील घटना

पुणे :जुन्नरमध्ये होत असलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात एक बालविवाह होणार होता. पुणे जिल्हा महिला बालविकास विभागाला याची कुणकुण लागताच मंगल कार्यालयात जाऊन हा बालविवाह रोखण्यात अधिकाऱ्यांना यश आले आहे.

जुन्नर तालुक्यात सोमवारी २६ फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वाचार वाजेच्या मुहूर्तावर ९ जणांचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात एका अल्पवयीन मुलीचा विवाह करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. सर्व अधिकारी पोलिसांसह विवाहस्थळी पोहोचले. त्यावेळी या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी जवळपास १ हजाराहून अधिक वऱ्हाडी मंडळींची उपस्थिती होती.

अधिकाऱ्यांनी आपण येण्याचे कारण सांगून मुलीच्या शाळेच्या दाखल्याची पाहणी केली. त्यावरील जन्मतारखेनुसार मुलीचे वय १५ वर्षे ६ महिने, तर मुलाचे वय २४ वर्षे असल्याचे दिसून आले. मुला-मुलीचे आई-वडील व नातेवाइकांचे समुपदेशन करून त्यांना कायद्याची माहिती देण्यात आली. मुलीचे १८ व मुलाचे २१ वर्षे वय पूर्ण झाल्याशिवाय त्यांचा विवाह करणार नाही, असा जबाब लिहून घेण्यात आला.

हा बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा महिला बालविकास अधिकारी मोनिका रंधवे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिरसे यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल पवार, तालुका संरक्षण अधिकारी भाग्यश्री घाडगे, जुन्नर बालविवाह प्रतिबंधक अधिकारी सोमनाथ वायळ, पोलिस पाटील प्रीती कवडे हे ग्रामसेवक व पोलिस उपनिरीक्षक अनिल केरूरकर यांचे सहकार्य लाभले.

बालविवाह झाल्यास कायद्यानुसार शिक्षेची तरतूद आहे. मंगल कार्यालय मालकांनी, तसेच पालकांनी आधार कार्ड, तसेच जन्मतारखेचा किंवा शाळा सोडल्याचा दाखला, शाळेतील जन्मनोंद या कागदपत्रांचा आधार घेऊन वयाची खात्री करावी. आपल्या आसपास बालविवाह होत असल्यास त्वरित चाइल्ड हेल्प लाइन नंबर १०९८, पोलिस हेल्पलाइन नंबर ११२ किंवा पोलिस अधिकारी किंवा महिला बालविकास विभागास माहिती देऊन प्रशासनाची मदत करावी, अशी माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी केले आहे.

Web Title: The girl is fifteen years old! Prevent child marriage as soon as it occurs; Incidents in Junnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.