लोहगाव - घरापुढे घातलेला मांडव, रात्री उशीरापर्यंत चाललेली हळद नवरदेवासह घरातील सर्वांचीच चालू असलेली लगबग ही होती संगिता जाधव यांच्या घरातील लगीनघाई. त्यांच्या एकुलत्या एक मुलाचा विवाहसोहळा. शुक्रवार (ता २०) रोजी पुण्याहून महाड येथे लग्नसोहळ्या करिता चाललेल्या वऱ्हाडातील खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसचा अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यु झाला. तर काही जखमी झाले. मृतांपैकी संगिता धनंजय जाधव (४६), रा. सेव्हन हिल्स रेसीडन्सी, लेन नं ६, चऱ्होली, पिंपरी चिंचवड यांचा जागीच मृत्यु झाला. संगिता या नवरदेव मुलगा स्वप्निल जाधव यांच्या आई होत्या.
कोकणातील मांडला गावातील मुळ रहिवासी असलेले जाधव कुटुंब नोकरी-व्यवसायानिमीत्त पुण्यात आले आणि चऱ्होली येथे स्थायिक झाले. वडिल धनंजय हे रिक्षाचालक आहेत तर आई खाजगी नोकरी करत होती. मुलगा धनंजय हा ही खाजगी नोकरीला होता. सकाळी घरातून निघतांना वडिल चारचाकीने पुढे गेले तर आई संगिता या बसमध्ये बसल्या.
गुरुवारी रात्री उशीरापर्यंत जाधव यांच्या घरी हळदीचा कार्यक्रम सुरु होता. या निमीत्ताने अनेक पाहुणे त्यांच्याघरी उपस्थित होते. सकाळी सव्वासहाचे दरम्यान काही वऱ्हाडी मंडळी बसने तर काही इतर वाहनांनी विवाहस्थळ असलेल्या काटेदरे पोस्ट मोहोद, महाड जि. रायगड येथे निघाले. ताम्हिणी घाटाच्या आसपास चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस एका बाजूवर उलटली. या अपघातात मृत आणि जखमी झालेले सर्वच जण हे जाधव कुटुंबाचे जवळचे नातेवाईक आहेत. जखमीपैकी काहींना ससून रुग्नालयात आणण्यात आले आहे.
- या अपघातात मृत झालेल्या वंदना जाधव (अंदाजे वय ४०, रा. औंध रस्ता, पुणे) या सहसा लग्न कार्यक्रमांना जात नसत, मात्र त्या या विवासोहळ्याला गेल्या आणि त्यांच्यावर काळाने घाला घातला. असे त्यांचे नातेवाईक सतिश जगताप यांनी सांगितले.- या अपघातात मृत झालेले गौरव अशोक धनावडे ( अंदाजे वय २५, रा. पुणे) यांना त्यांच्या पश्चात पत्नी व एक-दिड वर्षांचा मुलगा असल्याने कुटुंबात हळहळ व्यक्त केली जात आहे.-या अपघातात मृत झालेल्या शिल्पा प्रदीप पवार (अंदाजे वय-४५, रा. खडकमाळ आळी पुणे) या नवरदेवाच्या भावजय आहेत. तर एका मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.
वडिल आणि मुलगा दोघेही अनभिज्ञबसचा भीषण अपघात झाल्यानंतर लग्नसोहळ्यात अडथळा येऊ नये, याकरिता नातेवाईकांनी समयसूचकता दाखवतं नवरदेव मुलगा व त्याचे वडिल यांना त्यांची पत्नी संगिता गेल्याचे कळविले नाही. किरकोळ अपघात झाल्याचे कळवून लग्नसोहळा आटोपून घेतला. लग्नसोहळ्याहून घरी येईपर्यंत दोघेही याबाबत अनभिज्ञ होते. एकुलत्या एक मुलाचा होऊ घातलेला विवाहसोहळा न पाहताच संगिता यांचा मृत्यु झाल्याने कुटुंबात तसेच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.