कोट्यवधींचा गंडा घालून संचालक दुबईला फरार; गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 07:01 IST2023-03-27T07:01:12+5:302023-03-27T07:01:18+5:30
आणखी काहींची फसवणूक झाली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

कोट्यवधींचा गंडा घालून संचालक दुबईला फरार; गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष
पुणे : गुंतवणुकीवर दरमहा पाच ते सहा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. नंतर कोट्यवधींचा गंडा घातला आणि प्रभात रोडवरील कार्यालय बंद करून संचालक दुबईला पळून गेला. पोलिसांकडे दोघा व्यावसायिकांच्या तक्रारी आल्या असून त्यांची अडीच कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. आणखी काहींची फसवणूक झाली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
याप्रकरणी शिवणे येथील महिलेने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विक्रांत रमेश पाटील (वय २५, रा. मोराळे, राजापूर, सांगली), संतोषकुमार विष्णू गायकवाड (रा. बलवडी, ता. खानापूर, सांगली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार प्रभात रोडवरील कार्यालयात २० ते २७ ऑगस्ट २०२१ दरम्यान घडला होता.
आधी पैसे दिले, मग दोन कोटींना गंडा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पतीचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. संतोषकुमार गायकवाड याने दरमहा पाच ते सहा टक्क्यांपर्यंत परतावा देण्याचे आमिष दाखविल्यावर फिर्यादी यांनी त्यांच्याकडे सुरुवातीला एक कोटी रुपयांची गुंतवणूक केली. त्या परतावा म्हणून त्याने ८० लाख रुपये परत दिले. पुढे विश्वास संपादन करून त्याने दाेन कोटी रुपयांची फसवणूक केली.