ओतूर (जुन्नर) : जुन्नर तालुक्यातील ठिकेकरवाडी परिसरात बुधवारी (दि. ५) रात्री उशिरा घडलेल्या एका धक्कादायक प्रकाराने ग्रामस्थांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. रात्री साडेअकराच्या सुमारास गणेश दिगंबर बर्डे यांच्या घराच्या शेडमध्ये बिबट्याने अचानक प्रवेश केल्याने क्षणभर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेच्या वेळी घराचा मुख्य दरवाजा बंद होता. मात्र घराच्या बाहेरील शेडमध्ये सुमारे सात ते आठ कोंबड्या ठेवलेल्या होत्या. अचानक कोंबड्यांच्या मोठ्या आरडाओरडीने बर्डे कुटुंबियांना काहीतरी अनर्थ घडल्याची शंका आली. त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिले असता शेडमध्ये एक बिबट्या हालचाल करत असल्याचे स्पष्ट दिसले. क्षणभर त्यांना आपल्या डोळ्यांवरच विश्वास बसेना. या प्रसंगाचा थरारक व्हिडिओ गणेश बर्डे यांनी तत्काळ मोबाईलमध्ये टिपला असून, तो आता परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.
गणेश बर्डे यांनी सांगितले की, “गेल्या काही दिवसांपासून आमच्या ठिकेकरवाडी परिसरात बिबट्या वारंवार दिसत आहे. मात्र पहिल्यांदाच त्याने घराच्या शेडमध्ये प्रवेश केला आहे. आमच्या कुटुंबात सात जण आहेत आणि सगळेच भयभीत अवस्थेत आहेत. वनविभागाने लवकरात लवकर योग्य ती कारवाई करून बिबट्याला जेरबंद करावे”, अशी मागणी त्यांनी केली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तातडीने ठिकेकरवाडी गाठली. अधिकाऱ्यांनी बिबट्याच्या हालचालींचा तपास सुरू केला असून, परिसरात पिंजरा लावण्याची प्रक्रिया हाती घेण्यात येत असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, या घटनेनंतर ठिकेकरवाडी व परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी कोणीही बाहेर पडण्यास धजावत नाही. स्थानिकांनी वनविभागाला रात्री गस्त वाढवण्याची आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. गावातील काही नागरिकांनी सांगितले की, “शेतशिवारात आणि पाणवठ्याजवळ बिबट्याचे ठसे अनेकदा दिसले आहेत. आता तर तो गावातच शिरत असल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. वनविभागाने तातडीने पिंजरे लावून बिबट्याला पकडावे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. वनविभागाचे अधिकारी सांगतात की, “ठिकेकरवाडी परिसरात बिबट्याच्या उपस्थितीबाबत आम्हाला माहिती मिळाली आहे. गावाच्या हद्दीत पिंजरे लावण्याची प्रक्रिया सुरू असून, नागरिकांनी घाबरू नये. सावधगिरी बाळगावी आणि बिबट्याच्या हालचालीबद्दल तात्काळ वनविभागाला कळवावे”, असे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेमुळे ठिकेकरवाडी गावात मोठी चर्चा रंगली असून, नागरिक सतत बिबट्याच्या शोधात वर्तुळ रचून पहारा देत आहेत. बिबट्याचा पुन्हा शिरकाव होऊ नये यासाठी ग्रामस्थ आणि वनविभागाने संयुक्तपणे दक्षता घेतली आहे.
Web Summary : A leopard entered a house in Junnar after chickens raised alarm. The family is terrified, and villagers demand immediate action from the forest department, including trapping the leopard. Fear grips the area.
Web Summary : जुन्नर में मुर्गियों के शोर के बाद एक तेंदुआ घर में घुस गया। परिवार भयभीत है, और ग्रामीणों ने वन विभाग से तेंदुए को पकड़ने सहित तत्काल कार्रवाई की मांग की। इलाके में दहशत।