पुणे : ‘गणेश मंडळांनी नियमांचे पालन करून शिस्तबद्धपणे गणेशोत्सव उत्साहात साजरा करावा. पुणे पोलिस गणेश मंडळांच्या पाठीशी आहेत, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले. दरम्यान, मंडळांना दिल्या जाणाऱ्या सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पुणे पोलिस आणि विघ्नहर्ता न्यासाकडून आयोजित केलेल्या आदर्श गणेशोत्सव २०२४, स्पर्धेचा पारितोषिक प्रदान सोहळा शुक्रवारी शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात झाला. या सोहळ्यात अमितेश कुमार बोलत होते. यावेळी सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, विघ्नहर्ता न्यासाचे विश्वस्त, ज्येष्ठ पत्रकार राजीव साबडे, डाॅ. मिलिंद भोई, उदय जगताप, अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, मनोज पाटील, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त ऋषिकेश रावले, मिलिंद माेहिते, संभाजी कदम, सोमय मुंडे, डाॅ. राजकुमार शिंदे, वाहतूक शाखेचे उपायुक्त हिंमत जाधव उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्या मंडळांना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.
अमितेश कुमार म्हणाले, ‘विसर्जन मिरवणुकीतील सहभागावरून सुरू असलेला वाद मिटला आहे. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून समन्वयाचा मार्ग काढण्यात आला आहे. गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे. मंडळांना काही अडचण जाणवत असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधवा. मंडळांना विविध प्रकारच्या परवानगी एकाच ठिकाणी मिळणार आहे. ‘उत्सवाच्या काळात परगावाहून मोठ्या संख्येने भाविक येतात. भाविकांची सुरक्षा विचारात घेऊन बंदोबस्ताची आखणी करण्यात आली. मंडळांनी मंडपाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. हे कॅमेरे मुख्य नियंत्रण कक्षाशी जोडण्यात येणार असल्याचेही अमितेश कुमार यांनी नमूद केले.