SPPU: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहांची क्षमता सहाशेने वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 01:23 PM2024-02-03T13:23:01+5:302024-02-03T13:23:47+5:30

विद्यापीठ कॅम्पसमधील वसतिगृह प्रवेश क्षमतेत यंदा सहाशेने भर पडेल, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनातर्फे देण्यात आली....

The capacity of hostels in Savitribai Phule Pune University will increase by six hundred | SPPU: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहांची क्षमता सहाशेने वाढणार

SPPU: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहांची क्षमता सहाशेने वाढणार

- प्रशांत बिडवे

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उच्चशिक्षण घेण्याचे देशभरातील विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. त्यासाठी महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातून विद्यार्थी प्रवेश घेतात. मात्र, गतवर्षी विविध विभागात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या अर्जांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले आहे. वसतिगृह न मिळणे हेदेखील प्रवेश अर्जात घट हाेण्यामागील प्रमुख कारण असल्याचे निर्दशनास आले आहे. ही बाब गांभीर्याने घेत वसतिगृहाची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विद्यापीठ कॅम्पसमधील वसतिगृह प्रवेश क्षमतेत यंदा सहाशेने भर पडेल, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनातर्फे देण्यात आली.

विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुणे शहरात खाेली अथवा सदनिका घेऊन राहणे खर्चिक आहे शिवाय शहरात इतर ठिकाणी राहून विद्यापीठात येण्या-जाण्यासाठी विद्यार्थ्यांचा माेठ्या प्रमाणात वेळही वाया जाताे. त्यामुळे विद्यापीठाच्या ऐतिहासिक, निसर्गरम्य कॅम्पसमध्ये राहून दर्जेदार उच्चशिक्षण घेता यावे, यासाठी विद्यार्थी वसतिगृहात प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न करतात.

विद्यापीठातील विविध विभागाची प्रवेश क्षमता सुमारे आठ हजार एवढी आहे. मात्र, कॅम्पसमध्ये मुलांचे ९ आणि मुलींची १० अशी एकूण १९ वसतिगृहे आहेत. या वसतिगृहात पदवी, पदव्युत्तर आणि पीएच.डी. अभ्यासक्रमांची मुले-मुली मिळून ३ हजार इतकी प्रवेश क्षमता आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये वसतिगृहासाठी सुमारे प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या २६२७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले हाेते. त्यापैकी केवळ १२५६ विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळाले हाेते. त्याच पार्श्वभूमीवर गतवर्षी २०२३-२४ मध्ये या शैक्षणिक वर्षात विविध विभागांसाठी प्रवेश अर्जांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले हाेते.

कॅम्पसमध्ये सध्या मुलांचे वसतिगृह क्र. ५ जवळ दाेनशे तसेच आंतरराष्ट्रीय मुलींसाठी ६० विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृहाचे बांधकाम सुरू आहे. नुकतेच प्रकाश जावडेकर यांनी खासदार निधीतून मुलींच्या वसतिगृह बांधकामासाठी साडेआठ काेटींची निधी दिला आहे. त्यातून पहिल्या टप्प्यात साडेतीनशे विद्यार्थी क्षमतेच्या इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ येत्या काही दिवसांत हाेणार आहे. पुणे विद्यापीठाचे नाशिक आणि अहमदनगर येथील उपकेंद्रात समाज कल्याण आणि आदिवासी विकास विभाग यांच्या सहकार्यातून वसतिगृह उभारणीसाठी प्रयत्न केले जात आहेत.

विद्यापीठाच्या विभागात प्रवेश घेतल्यानंतर मागणी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला वसतिगृहाची सुविधा मिळाली पाहिजे. त्यासाठी भविष्यात दहा हजार विद्यार्थी क्षमतेच्या वसतिगृहांची निर्मिती करण्याचे नियाेजन आहे. त्यासाठी सीएसआर निधी मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

- डाॅ. विजय खरे, प्रभारी कुलसचिव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Web Title: The capacity of hostels in Savitribai Phule Pune University will increase by six hundred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.