'तो' एक प्रयोग..! डॉ. नारळीकरांनी दिले होते फलज्योतिषांना 'चॅलेंज'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 13:33 IST2025-05-21T13:28:57+5:302025-05-21T13:33:45+5:30

भारतात ही चाचणी विचारपूर्वक घ्यायला हवी, ती कशी घेता येईल? या विवंचनेत मी असताना नरेंद्र दाभोलकर माझ्या मदतीला आले.

The bright star has disappeared..! Narlikar had given a challenge to the astrologers. | 'तो' एक प्रयोग..! डॉ. नारळीकरांनी दिले होते फलज्योतिषांना 'चॅलेंज'

'तो' एक प्रयोग..! डॉ. नारळीकरांनी दिले होते फलज्योतिषांना 'चॅलेंज'

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्याबरोबर एका प्रयोगात भाग घ्यायचा योग डॉ. जयंत नारळीकर यांना २००८ मध्ये आला होता, त्या अनुभवावर आधारित काही नोंदी त्यांनी साधना साप्ताहिकाच्या ३० ऑगस्ट २०१४ च्या अंकात मांडल्या आहेत. त्यातील सारांश...

भारत हा अंधश्रद्धांचा देश आहे, असे म्हणणे वावगे ठरू नये. ज्याप्रमाणे विचारस्वातंत्र्यामुळे इथे विविध धर्म, संप्रदाय, तत्त्वज्ञान आदींना आसरा मिळाला; त्याचप्रमाणे अंध विश्वासांनादेखील खतपाणी मिळाले. फलज्योतिष आणि वास्तुशास्त्र यांचा उगम मुळात भारतात झाला नसला, तरी त्यात लक्षणीय वाढ इथेच झाली. आज फलज्योतिषाचा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या भारतात जेवढी आहे, तितकी जगातल्या बाकीच्या सर्व देशांत मिळूनही नसावी. या अंधश्रद्धांना आवर घालणारा प्रमुख उपाय म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास करणे होय. हा दृष्टिकोन विज्ञानातून उद्भवला असला तरी त्याचा वापर इतर क्षेत्रांत, दैनंदिन जीवनात होऊ शकतो. एखादे विधान ठामपणे एखाद्या अधिकारी व्यक्तीने केले, तर ते विश्वासार्ह असेलच असे नाही. त्याची स्वतंत्रपणे तपासणी, शहानिशा करूनच ठरवावे, असे वैज्ञानिक दृष्टिकोन सांगतो.

उदाहरणार्थ लग्न यशस्वी की अयशस्वी होईल, हे पत्रिका जुळतात का नाही यावरून ठरते, असे फलज्योतिष सांगते. हे विधान प्रयोगांनी तपासता येईल. लग्न जुळून यशस्वी ठरलेल्या जोडप्यांच्या पत्रिकांच्या जोड्या आणि लग्ने अयशस्वी ठरलेल्या जोडप्यांच्या पत्रिकांच्या जोड्या मिसळून (पत्ते पिसावेत तसे) फलज्योतिषतज्ज्ञांना तपासायला द्याव्यात. त्यांनी पत्रिका जुळणे, न जुळणे याबद्दलचे आपले निकष लावून कुठली लग्ने यशस्वी ठरली आणि कुठली नापास झाली, ते सांगावे. त्यांचे निदान वस्तुस्थितीप्रमाणे आहे की नाही, ते संख्याशास्त्राचे नियम ठरवतील. अमेरिकेत असा प्रयोग केला गेला आणि त्यात फलज्योतिष नापास ठरले होते. भारतात ही चाचणी विचारपूर्वक घ्यायला हवी, ती कशी घेता येईल? या विवंचनेत मी असताना नरेंद्र दाभोलकर माझ्या मदतीला आले. पत्रिका जुळणे, न जुळणे याला सोपा पर्याय त्यांनी सुचवला.

लग्न झालेल्या/मोडलेल्या जोडप्यांऐवजी हुशार/मतिमंद अशा मुलांची चाचणी घ्यावी. 'हुशार' हे विशेष शाळेत त्या मुलाच्या कीर्तीवरून ठरवणे सोपे आहे. त्याचप्रमाणे मतिमंद मुलाच्या शाळेत त्यांची माहिती मिळू शकते. एकूण, इथे शंका घ्यायला जागा नाही. फलज्योतिषांचा दावा असतो की जन्मपत्रिकेमधून सांगता येते की, ज्याची ती पत्रिका आहे तो विद्यार्थी हुशार आहे की मतिमंद. तपासणीच्या प्रयोगासाठी दाभोलकरांनी अंनिसच्या मदतीने ही माहिती गोळा करायची तयारी दाखवली. यात विद्यापीठातील संख्याशास्त्र विभागाचे निवृत्त प्राध्यापक सुधाकर कुंटे यांनी प्रयोगाची एकंदर आखणी आणि कृतीबाबत मार्गदर्शन करायची जबाबदारी स्वीकारली. तसेच, प्रत्येक विद्यार्थ्यांची माहिती (जन्मवेळ, जन्मस्थान आदी) घेऊन त्याची पत्रिका बनवायचे काम प्रकाश घाटपांडे यांनी अंगावर घेतले. घाटपांडे हे पूर्वी स्वतः फलज्योतिषाचा व्यवसाय करत; पण नंतर त्यातील सत्याचा अभाव पाहून त्यांनी तो सोडून दिला होता. अंनिसच्या मदतीने आम्ही शंभर हुशार मुले व शंभर मतिमंद मुले यांची आवश्यक ती माहिती मिळवली आणि घाटपांडे यांनी ती माहिती वापरून त्यांच्या जन्मकुंडल्या तयार केल्या. सर्व पत्रिकांचे सांकेतिक रेकॉर्ड सुधाकर कुंटे यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. ते रेकॉर्ड पाहिल्याशिवाय कुठली कुंडली कोणाची, हे सांगणे शक्य नव्हते. 

प्रयोगाची सुरुवात म्हणून आम्ही चौघांनी दि. १२ मे २००८ रोजी पत्रकार परिषद घेत व्यावसायिक फलज्योतिषांनी या प्रयोगात भाग घ्यावा, असे आवाहन केले. फलज्योतिषांनी सदर कुंडल्यांचा अभ्यास करून प्रत्येक कुंडलीवर ती हुशार मुलाची आहे की मतिमंद मुलाची? ते त्यावर लिहून पाठवावे. या प्रयोगात भाग घेण्यासाठी ५१ फलज्योतिष तज्ज्ञांनी रजिस्टर्ड पाकिटे पाठवली. पण त्यांपैकी २७ स्पर्धकांनी उत्तरे पाठविली. त्यात सर्वोच्च रेकॉर्ड ४० पैकी २४ बरोबर त्यापाठोपाठ दोघांचे ४० पैकी २२ बरोबर. म्हणजे ४० पैकी २८ ही 'पास' व्हायची लाइन कोणीही ओलांडू शकला नाही.

सर्व २७स्पर्धकांच्या मार्काची सरासरी ४० पैकी १७.२५ होती. यावर काही फलज्योतिषी म्हणू लागले की, ज्या स्पर्धकांनी भाग घेतला ते निष्णात फलज्योतिषी नव्हते; म्हणून निकाल फलज्योतिषाविरुद्ध लागला. पण आमच्याकडे जे ५१ स्पर्धक प्रथम आले, त्या सर्वांनी स्वतःचा अनेक वर्षाचा त्या विषयाचा अनुभव मांडला होता. शिवाय एका संस्थेने भाग घेतला, त्याचे काय? त्या संस्थेतील सगळे सदस्य फलज्योतिषी नव्हते का? या धर्तीवर आणखी प्रयोग करता येण्याजोगे आहेत. खुद्द नरेंद्र दाभोलकरांचा त्याला पाठिंबा होता. त्यांच्या पश्चात इतर सत्यशोधक त्यासाठी पुढे येतील, अशी आशा आहे.

Web Title: The bright star has disappeared..! Narlikar had given a challenge to the astrologers.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.