पुणे : नवरात्र म्हणजे नऊ रात्रींचा समूह. या नऊ रात्रींमध्ये भाविक दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा करतात. सोमवारपासून (दि.२२) शारदीय नवरात्रास प्रारंभ होत असून, नवरात्र उत्सवासाठी शहरातील देवींची मंदिरे सजली आहेत. देवीच्या घटस्थापनेसाठी पहाटे ५ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत सर्वोत्तम मुहूर्त आहे. संपूर्ण नऊ दिवस नऊ रात्री देवीची पूजा आणि गोंधळ घालून देवीच्या मंदिरात हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
नवरात्र उत्सवाची पौराणिक कथा
नवरात्र उत्सवाशी पौराणिक कथा गुंफली गेली आहे. ही कथा देवीदुर्गा आणि महिषासुरमध्ये झालेल्या युद्धाची आहे. ज्यात देवीदुर्गा वाईट शक्तींचा नाश करून चांगल्याचा विजय मिळवते. महिषासुराला मिळालेल्या वरदानामुळे तो अजिंक्य होता, त्यामुळे त्याला हरवण्यासाठी देवी दुर्गेने नऊ रात्री युद्ध करून त्याचा वध केला. या नऊ रात्रींच्या युद्धात दुर्गा मातेच्या विविध रूपांची पूजा केली जाते आणि दहावा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो, जो ‘वाईटावर चांगल्याच्या विजयाचा’ दिवस मानला जातो.
घटस्थापना विधी
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अनेक जण घरात देवीची मूर्ती किंवा छायाचित्र ठेवून घटाची स्थापना करतात. हा घट म्हणजे देवीच्या पुढे एक परडी ठेवून त्यात माती टाकली जाते व त्या मातीत पहिल्या दिवशी धान्य टाकतात. मग नऊ दिवस या घटाला पानांच्या फुलांच्या वेगवेगळ्या माळा बांधतात व पाणी घालतात. नऊ दिवसांत ते धान्य उगवते व घट पूर्ण होतो. या नऊ दिवसांत दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. देवीला प्रसन्न करण्यासाठी विविध मंत्र आणि स्तोत्र पठण करतात.
नऊ दिवसांचे व्रत
अनेक भक्त देवीला प्रसन्न करण्यासाठी नऊ दिवस कडक उपवास ठेवतात. हा उपवास काही जण फक्त फळे खाऊन करतात तर काही जण केवळ पाण्यावर व्रत करतात. या काळात अनेक जण चामड्याच्या वस्तू धारण करत नाहीत. तर नऊ दिवस व्रत करणारे भक्त यावेळी चप्पल घालत नाहीत. काही जण गादीवर झोपत नाहीत. नवमी झाल्यानंतर दशमीला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी देवीची पूजा करून घट विसर्जित केल्यानंतर हे व्रत सोडतात. ज्या भक्तांना नऊ दिवसांचे व्रत जमत नाही ते लोक प्रथम दिवशी व अष्टमी, नवमीचे व्रत करतात.