Ram Navami Utsav: जय श्रीराम! पुण्याच्या तुळशीबागेतील २६१ व्या रामनवमी उत्सवास गुढीपाडव्याला प्रारंभ होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 01:31 PM2022-03-31T13:31:27+5:302022-03-31T13:31:41+5:30

श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने दि. २ ते १९ एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन

The 261st Ram Navami celebrations in Pune Tulshibag will begin on Gudipadva | Ram Navami Utsav: जय श्रीराम! पुण्याच्या तुळशीबागेतील २६१ व्या रामनवमी उत्सवास गुढीपाडव्याला प्रारंभ होणार

Ram Navami Utsav: जय श्रीराम! पुण्याच्या तुळशीबागेतील २६१ व्या रामनवमी उत्सवास गुढीपाडव्याला प्रारंभ होणार

googlenewsNext

पुणे : श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने शनिवार, दिनांक २ एप्रिल ते मंगळवार, दिनांक १९ एप्रिल दरम्यान श्रीराम जन्मोत्सवानिमित्त तुळशीबाग येथील राम मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवांतर्गत श्रीरामरक्षा, अथर्वशीर्ष पठण, महापूजा, पालखी, श्रीरामजन्म सोहळा, श्रीरामराज्याभिषेक सोहळा अशा धार्मिक कार्यक्रमांबरोबरच भक्तीप्रवचन, सांगितीक कार्यक्रम, कीर्तन, भजन अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थानचे कार्यकारी विश्वस्त रामदास तुळशीबागवाले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
पत्रकार परिषदेला उद्धव तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, शिशिर तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता. रामनवमी उत्सवाचे यंदा २६१ वे वर्ष आहे.
 
गुढीपाडव्याला शनिवार, दिनांक २ एप्रिल रोजी श्रीरामनवमी उत्सवास प्रारंभ होणार असून त्यादिवशी सकाळी ७ पासून श्रीरामास पवमान अभिषेक, श्रीरामरक्षा, अथर्वशीर्ष, श्रीविष्णूसहस्त्रनाम, श्रीसूक्त व पुरूषसूक्त पठण होणार आहे. तसेच दि. ३ एप्रिल ते दि. ९ एप्रिल दरम्यान दररोज सकाळी ९ वाजता रामायण वाचन, दुपारी १२ वाजता श्रीरामांची महापूजा व आरती, सायंकाळी 7.३० वाजता श्रीरामांच्या छबिन्याची मिरवणूक व आरती महापूजा होणार आहे. तर, दिनांक ३ एप्रिल ते ७ एप्रिल दरम्यान दररोज सायंकाळी ५.३० वाजता विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांचे प्रवचन होणार आहे. दिनांक ३ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता नाम रामायणम् गोविन्दाष्टकम् पठण हा विशेष कार्यक्रम देखील होणार आहे.
 
श्रीराम जन्मानिमित्त रविवार, दिनांक १० एप्रिल सकाळी १०.३० वाजता ह.भ.प. दर्शनबुवा वझे यांचे श्रीरामजन्माचे कीर्तन होणार असून त्यानंतर सकाळी ११ वाजता श्रीरामांच्या पोषाखाची मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर श्रीरामजन्माचा मुख्य उत्सव साजरा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता श्रीरामांच्या छबिन्याची मिरवणूक निघणार आहे.
 
मंगळवार, दिनांक १२ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता लळीत व पायघडीचे कीर्तन आणि समस्त तुळशीबागवाले परिवाराकडून श्रीरामराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. शनिवार, दिनांक १६ एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी ६ वाजता ब्रह्मवृंदाकडून श्रीहनुमंतास रुद्राभिषेक व सकाळी ६.३० वाजता ह.भ.प.ज्ञानेश्वरबुवा कपलाने यांचे श्रीहनुमान जन्माचे कीर्तन होणार आहे. मंगळवारी, दिनांक १९ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता श्रीसत्यनारायण महापूजेने उत्सवाची सांगता होणार आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत नवोदितांसह दिग्गज कलाकारांची गायन व वादनसेवा

उत्सवादरम्यान दररोज रात्री ८.३० वाजता मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २ एप्रिल रोजी पं.रघुनंदन पणशीकर यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होणार आहे. तर, दिनांक ३ एप्रिल रोजी  रात्री गायिका सावनी दातार व शिल्पा पुणतांबेकर यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. दिनांक ५ एप्रिल रोजी संपदा वाळवेकर व सहका-यांचे गायन, दिनांक ६ एप्रिल रोजी आनंद भीमसेन जोशी, दिनांक ७ एप्रिल रोजी प्रख्यात गायक आनंद भाटे, दिनांक ८ एप्रिल रोजी चैत्राली अभ्यंकर व शशांक दिवेकर यांच्या गायनाचा कार्यक्रम होईल. तसेच, दिनांक ९ एप्रिल रोजी हिमांशु बक्षी यांचा बासरीवादनाचा कार्यक्रम सकाळी १०.३० वाजता होणार आहे. सर्व कार्यक्रम विनामूल्य असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Web Title: The 261st Ram Navami celebrations in Pune Tulshibag will begin on Gudipadva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.