पुणे: हनुमान जयंतीनिमित्त दर्शनासाठी आलेल्या खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी जवळच्या दर्ग्यात जाऊन अजान बंद करण्याची मागणी केली व हुज्जत घातली, असा आरोप नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी संस्थेने केला आहे, तर त्यानंतर लगेचच खासदार कुलकर्णी यांनी आरोप सिद्ध करून दाखवा, अन्यथा मीच गुन्हा दाखल करण्याची मागणी करेल, असे आव्हान दिले.
नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी संस्थेचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी याबाबत पोलिसांकडे खासदार कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्या दर्ग्याशेजारील हनुमान मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. त्यावेळी तिथे दर्ग्यात अजान सुरू होती. ती बंद करावी यासाठी त्यांनी तिथे असलेल्या भाविकांबरोबर हुज्जत घातली, असे डंबाळे यांचे म्हणणे आहे.
याबाबत खासदार कुलकर्णी यांनी लगेचच समाजमाध्यमावर खुलासा केला. मी रस्त्यावर होते हे संबंधित व्हिडीओ चित्रणामध्ये स्पष्ट दिसते आहे. त्यामुळे दर्ग्यात जाण्याचा प्रश्नच नाही. हनुमान जयंती होती. आम्ही दर्शनासाठी आलो होतो. अजानच्या आवाज कमी करावा, असे त्यांना सांगितले, त्यामुळे हुज्जत घालण्याचा काही प्रश्नच नाही. त्यामुळे आता संबंधित संस्थेने केलेले आरोप त्यांनीच सिद्ध करावे, अन्यथा मी त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे असे त्या म्हणाल्या.
त्यांच्यावरच मला गुन्हा दाखल करावा लागेल
आम्ही त्यांना आजांचा आवाज कमी करण्यासाठी विनंती केली होती. हनुमान जयंती आम्ही करायला गेलो असता त्यांनी गैरवर्तन केलं असल्याचे त्यामध्ये दिसत आहे. त्या व्हिडिओ मध्ये हे पण दिसतंय की, मी कानावर हात ठेवलेले आहेत. माझी सुरक्षितता धोक्यात आलेली आहे. या संदर्भात मी पोलिसांना विनंती केलेली आहे की. माझी सुरक्षितता जी आहे याची काळजी घेण्यासाठी माझ्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करावी. आणि या संस्थेने खोटे आरोप केल्याबद्दल त्यांच्यावर मला गुन्हा दाखल नक्कीच करावा लागेल आणि याचं स्पष्टीकरण करून त्यांनाच त्याबद्दलचं शासन व्हावं अशी माझी आग्रहाची मागणी आहे.