आधी चाचणी करा मगच पुण्यात या, केरळमधून येणाऱ्या प्रवांशांना प्रवेशबंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 22:29 IST2021-02-18T22:29:06+5:302021-02-18T22:29:50+5:30
कोरोना बाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेने कडक पावलं उचलली आहेत

आधी चाचणी करा मगच पुण्यात या, केरळमधून येणाऱ्या प्रवांशांना प्रवेशबंदी
पुणे : महापालिका हद्दीत केरळ राज्यातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी शहरात प्रवेश करण्यापूर्वीच करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. केरळ राज्यात कोरोना वाढीचा उद्रेक झाल्याने येथून येणाऱ्या प्रत्येकाची आरटीपीसीआर टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे.
कोरोना बाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेने कडक पावलं उचलली आहेत. त्यानुसार लग्न समारंभाची मंगल कार्यालये, जिमखाना, नाईट क्लब, उपहारगृहं, चित्रपटगृहं, सर्वधर्मिय स्थळं, खेळाची मैदाने व उद्याने, सार्वजनिक ठिकाणे, शॉपिंग मॉल, सर्व खासगी कार्यालये या ठिकाणी गर्दी न करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. तसेच, या ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक केले असून नियम न पाळणाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे. पुण्यातही कोरोनाचे नियम सक्तीने पाळण्याचे बजावण्यात आले आहे. त्यामुळेच, केरळमधून येणाऱ्या प्रवाशांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश गुरूवारी दिले आहेत. त्यामुळे रेल्वे, विमान व बससह केरळमधून खासगी वाहनांनी येणाऱ्या सर्वांची तपासणी करणे बंधनकारक झाले आहे. याबाबत महापालिकेने पोलिस प्रशासनासही याबाबत राज्य शासनाच्या सुचनेनुसार याबाबत तपासणीचे आदेश दिले आहेत.