पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
By नारायण बडगुजर | Updated: April 27, 2025 00:10 IST2025-04-27T00:08:38+5:302025-04-27T00:10:55+5:30
राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) या व्हिडिओची तपासणी केली जात आहे...

पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
पिंपरी : पुणे जिल्ह्यातील देहूरोड येथील पर्यटक पर्यटनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी मोबाइलमध्ये काढलेल्या व्हिडिओमध्ये दोन दहशतवादी दिसत असल्याचा दावा देहूरोडच्या पर्यटकांनी केला आहे. राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) या व्हिडिओची तपासणी केली जात आहे.
देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्ता त्यांच्या कुटुंबियांसह जम्मू-काश्मीर येथे पर्यटनासाठी गेले होते. १८ एप्रिल रोजी त्यांनी पहलगाम येथील बैसरण व्हॅलीला भेट दिली होती. त्यानंतर दुपारी ते तिथून साडेसात किलोमीटर अंतरावरील बेताब व्हॅलीला गेले होते. त्यावेळी सामाजिक कार्यकर्त्याने त्याच्या लहान मुलीचा नृत्य करतानाचा मोबाइलमध्ये व्हिडिओ काढला. त्यावेळी मुलगी नृत्य करत असताना तिच्या पाठीमागून दोन जण जात असल्याचे दिसून येत आहे. बेताब व्हॅली येथून संबंधित कुटुंबाने गुलमर्ग आणि श्रीनगरला भेट दिली. २१ एप्रिल रोजी जम्मूला गेले. दरम्यान, बैसरण व्हॅलीत दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती संबंधित सामाजिक कार्यकर्त्याला पुण्यात परत येत मिळाली. घरी पोहोचल्यानंतर त्यांनी मोबाइलमधील फोटो आणि व्हिडिओ पाहत असताना त्यात दोन जण संशयित असल्याचे त्यांना वाटले. सोशल मीडियावर दहशतवाद्यांचा फोटो आणि सामाजिक कार्यकर्त्याच्या मोबाइलमधील व्हिडिओतील दोन संशयित यांचे चेहरे मिळतेजुळते असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी याबाबत राष्ट्रीय तपास संस्थेशी संपर्क साधून त्यांच्याकडे व्हिडिओ दिला आहे. या व्हिडिओमधील संशयित दोन जण हे दहशवादी असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्याने केला आहे.
बेताब व्हॅली येथे १८ एप्रिल रोजी दुपारी २:३८ वाजताच्या सुमारास आम्ही व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यात दोन जण संशयास्पद वावरत असल्याचे वाटत आहे. एनआयएकडे याबाबत माहिती दिली आहे.
-सामाजिक कार्यकर्ता, देहूरोड, पुणे