लोकमत न्यूज नेटवर्कमाळेगांव : बारामती तालुक्यातील माळेगाव बु. नगरपंचायतीची निवडणुकीत शरद पवार गटाच्या पॅनल निर्मितीत महत्वाची भुमिका बजावणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष नितीन तावरे (वय ५०) यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी (दि १९) सायंकाळी सहाच्या सुमारास माळेगांवातील चोरमले वस्ती येथे हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. माळेगांवमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
माळेगांवात राजकीय हाडवैरी असणारा राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष आणि भाजप एकत्र आल्याने राज्यात चर्चेची ठरली आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप नेते रंजनकुमार तावरे एकत्र आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यातच शरद पवार गटाच्या शहराध्यक्षांवर हल्ला झाल्याने माळेगांव पुन्हा चर्चेत आले आहे. चोरमले वस्ती येथे हा प्रकार घडल्यानंतर जखमी झालेले नितीन तावरे थेट माळेगांव पोलीस ठाण्यात पोहचले. त्यांनी तातडीने खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क करत त्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना बारामती येथील सिल्व्हर जुबिली रुग्णालयात उपचारासाठी पाठविले आहे.
याप्रकरणी अद्याप तक्रार दाखल झालेली नाही. त्यामुळे मारहाणीचे कारण समजू शकले नसल्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांनी सांगितले. नगरपंचायत निवडणुकीत पवार तावरे यांची दिलजमाई झाली आहे. महायुतीच्या पॅनलसमारे शरद पवार गटाने उमेदवार देत आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आजची घटना चर्चेत आली आहे.
याबाबत खासदार सुळे यांनी हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव बु. नगरपंचायतीची निवडणूक लढवित असल्याचा राग मनात धरुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर समाजकंटकांनी प्राणघातक हल्ला केला. लोकशाही प्रक्रियेत निवडणूक लढविणे हा नागरिकांचा अधिकार आहे. या अधिकारावरच आक्रमण करुन नागरिकांचा आणि विरोधी पक्षाचा आवाज बंद करण्याचा प्रकार अतिशय संतापजनक आणि दुर्दैवी आहे. आम्ही सर्वजण या भ्याड हल्ल्ल्याचा निषेध करतो. माझी शासनाला विनंती आहे की कृपया हा हल्ला करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी. नीतीन तावरे हे या हल्ल्यात जखमी झाले आहेत, ते लवकरात लवकर बरे व्हावे ही ईश्वरचरणी प्रार्थना असे ट्विट खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
Web Summary : Nitin Taware, Sharad Pawar NCP city chief, was attacked in Malegaon amid Nagar Panchayat elections, causing tension. He informed Supriya Sule, and police are investigating. Sule demands strict action.
Web Summary : मालेगांव में शरद पवार एनसीपी के शहर अध्यक्ष नितिन तावरे पर नगर पंचायत चुनाव के बीच हमला हुआ, जिससे तनाव है। उन्होंने सुप्रिया सुले को सूचित किया, और पुलिस जांच कर रही है। सुले ने सख्त कार्रवाई की मांग की।