खेळताना विजेचा धक्का लागून दहा वर्षीय मुलाचा मृत्यू; वडगाव शेरी परिसरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2024 11:00 IST2024-06-15T10:58:12+5:302024-06-15T11:00:02+5:30
पुणे : खेळताना विजेचा धक्का लागल्याने दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना वडगाव शेरी येथील गणेशनगर भागात ...

खेळताना विजेचा धक्का लागून दहा वर्षीय मुलाचा मृत्यू; वडगाव शेरी परिसरातील घटना
पुणे : खेळताना विजेचा धक्का लागल्याने दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना वडगाव शेरी येथील गणेशनगर भागात घडली. मोहित वेदकुमार चावरा (वय १०, गल्ली क्रमांक ९, गणेशनगर, वडगाव शेरी) असे मृत मुलाचे नाव आहे. या प्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अधिक माहितीनुसार, मोहित चावरा हा बुधवारी (दि. १२) रात्री नऊच्या सुमारास मित्रांसोबत घराजवळ खेळत होता. त्यावेळी अचानक त्याचा हात अर्थिंगच्या वायरला लागला. वायरमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने विजेचा धक्का बसला अन् मोहित जागेवर कोसळला. त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांनी या घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले; पण, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
मोहितचे वडील व्यावसायिक आहेत. तो एका शाळेत चौथीत होता. चावरा कुटुंबीय मूळचे गुजरातचे असून, व्यवसायानिमित्त ते वडगाव शेरी भागात काही वर्षांपूर्वी स्थायिक झाले. अपघातानंतर महावितरणमधील अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.