Pune | वॉकिंग प्लाझासाठी लक्ष्मी रस्त्यावर वाहतुकीत तात्पुरता बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 16:20 IST2022-12-10T16:18:57+5:302022-12-10T16:20:03+5:30
वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे....

Pune | वॉकिंग प्लाझासाठी लक्ष्मी रस्त्यावर वाहतुकीत तात्पुरता बदल
पुणे : पादचारी दिनानिमित्त पुणे महापालिकेच्या वतीने ११ डिसेंबरला लक्ष्मी रस्त्यावरील उंबऱ्या गणपती चौक ते गरूड गणपती चौक दरम्यान ‘वॉकिंग प्लाझा’चे आयोजन केले आहे. त्यामुळे सकाळी नऊ ते दुपारी तीन दरम्यान या रस्त्यावरील वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.
लक्ष्मी रस्त्यावरील उंबऱ्या गणपती चौक ते गरूड गणपती चौक दरम्यान सर्व वाहने बंद राहणार आहेत. तसेच, सेवासदन चौक ते उंबऱ्या चौक दरम्यान वाहतुकीची परिस्थिती पाहून आवश्यकतेनुसार बदल करण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे : लक्ष्मी रस्त्याने बेलबाग चौकाकडून टिळक रस्त्याकडे जाणारी वाहने सेवासदन चौकातून बाजीराव रस्त्याने जातील.
निंबाळकर तालीमकडून लक्ष्मी रस्त्याने जाणारी वाहने कुंटे चौकातून सरळ कुमठेकर रस्त्यावरून इच्छित स्थळी जातील. नागनाथपारकडून उंबऱ्या गणपती चौकातून लक्ष्मी रस्त्यावरून जाणारी वाहने सरळ पत्र्या मारुती चौक, रमणबाग चौकातून इच्छित स्थळी जातील. तर पत्र्या मारुती चौकातून लक्ष्मी रस्त्याने जाणारी वाहने सरळ कुमठेकर रस्त्यावरून इच्छितस्थळी जातील. खालकर तालीम चौकातून विजय टॉकीज चौक, लक्ष्मी रस्त्याने न जाता कुमठेकर रस्त्याने इच्छितस्थळी जावे.