पुणे: महापालिका निवडणुकीत आघाडी असणार किंवा नाही, याबाबत त्वरीत निर्णय घ्यावा, अशी जाहीर मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी थेट प्रदेशाध्यक्ष व सरचिटणीसांसमोर केली आहे. उशिरा निर्णय झाला तर त्याचे परिणाम विपरीत होतील, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
पक्षाचे नूतन प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे व नूतन सरचिटणीस आमदार रोहित पवार यांचा पक्षाच्या वतीने नुकताच पुण्यातील पक्ष कार्यालयाच्या आवारात नुकताच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष जगताप यांनी आघाडीबाबत मागील निवडणुकीतील आकडेवारी देत भाष्य केले. विसर्जीत महापालिकेत एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस हा ४२ नगरसेवकांचा सर्वात मोठा विरोधी पक्ष होता. त्यानंतर सव्वातीन वर्षे झाली, महापालिकेची निवडणुकच झालेली नाही. दरम्यान राष्ट्रवादीत फुट पडली, शिवसेनेत दुफळी झाली. विभाजित राष्ट्रवादी व शिवसेना व काँग्रेस यांची आघाडी होऊन त्यांनी अडीच वर्षे राज्यातील सत्ताही राबवली.
आता महापालिकेसाठी महाविकास आघाडी म्हणून लढायचे असेल, तर तो निर्णय लवकर व्हावा, असे जगताप यांनी सांगितले. लोकसभा विधानसभेत एकत्र असल्याचा फायदाच झालेला आहे. त्यामुळे शक्यतो आघाडी करूनच निवडणूक लढवावी, मात्र त्याबाबतचा निर्णय त्वरीत व्हावा, त्यासाठीची प्राथमिक बोलणी वरिष्ठ स्तरावर आतापासूनच सुरू व्हावीत, अशी अपेक्षा जगताप यांनी व्यक्त केली. त्यामुळे स्थानिक स्तरावर उमेदवार निश्चितीला वेग येईल, मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी जास्त वेळ मिळेल व त्याचा मतदानात उपयोग होईल, असे त्यांनी सांगितले. स्वतंत्र लढायचे असेल, तर तोही निर्णय लवकर झाला तर त्याचाही फायदाच होईल असे ते म्हणाले.
महापालिकेची सत्ता आघाडीकडे येणे शक्य आहे, स्वतंत्र राष्ट्रवादीही सत्तेपर्यंत पोहचू शकतो, मात्र राजकीय निर्णय योग्य वेळेत घेणे गरजेचे आहे. हा निर्णय स्थानिक स्तरावर होणार नाही, त्यासाठी प्रदेशच्या नेत्यांनीच तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे, असे मत जगताप यांनी व्यक्त केले. जगताप यांच्या या जाहीर मागणीला सभेत उपस्थित कार्यकर्त्यांनीही जोरदार प्रतिसाद दिला. त्याची दखल घेत प्रदेशाध्यक्ष शिंदे व सरचिटणीस पवार यांनी यासंदर्भात लगेच हालचाली केल्या जातील, असे स्पष्ट केले. राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर चर्चा करून मित्र पक्षांबरोबर बैठकीची वेळ ठरवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची घाई सुरू असली, तरी आघाडीतील काँग्रेस व शिवसेना (उद्धव ठाकरे) या दोन पक्षांचे मात्र अजूनही तळ्यात मळ्यातच सुरू आहे. निवडणुकीची साधी मोर्चेबांधणीही करताना या पक्षाचे स्थानिक नेते किंवा कार्यकर्ते दिसत नाहीत. त्यांच्या पक्षाच्या इच्छुकांकडूनही याबाबत नेत्यांविषयी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.