बारामती : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने ग्राम विकास मंत्रीजयकुमार गोरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन जुन्या अवघड क्षेत्रातील सर्व शिक्षकांना संवर्ग - ३ चा लाभ देण्याची मागणी केली आहे. दुर्गम भागातील शिक्षकांच्या सोयीच्या बदल्यांसाठी संघटना आक्रमक असल्याची माहिती शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या मागणीनुसार ग्रामविकास मंत्रालयात झालेल्या बैठकीत बदली धोरणातील पुरवणी मागण्यांवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार ग्रामविकास विभागाने २८ मार्च रोजी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांबाबत नवीन परिपत्रक जारी केले. सदर परिपत्रकामध्ये ३० जून रोजी ५३ वर्षे वय पूर्ण झालेल्या शिक्षकांना बदलीसाठी संवर्ग १ चा लाभ देण्यात आला आहे. ज्या शिक्षकांचा सेवाकाळ १ वर्ष राहिलेला आहे त्या शिक्षकांना संवर्ग १ मधून बदलीची संधी देणे. आंतरजिल्हा बदलांबाबत दहा टक्के जागांची अट शिथिल करणे या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाकडून जयकुमार गोरे यांच्या संघटनेच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी भेट यांच्या घेऊन आभार व्यक्त करण्यात आले.
ग्रामविकास विभागाच्या २८ मार्चच्या परिपत्रकामध्ये काही दुरुस्त्यांची आवश्यकता असून २०२२ मध्ये फक्त विनंती अर्ज केलेल्या अवघड क्षेत्रातील शिक्षकांनाच बदलीची संधी देण्यात आली आहे. अनेक शिक्षकांनी सोयीच्या जागा रिक्त नसल्याने २०२२ मध्ये विनंती अर्ज केले नव्हते. अशा शिक्षकांना या परिपत्रकामुळे लाभ मिळत नाही. ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी परिपत्रकातील दुरुस्ती बाबतची आवश्यकता संवेदनशीलपणे समजून घेतली व सदर परीपत्रकामध्ये आवश्यक दुरुस्तीचे आश्वासन शिष्टमंडळास दिले. यावेळी शिक्षक नेते संभाजीराव थोरात, राष्ट्रीय नेते बाळासाहेब झावरे, कार्यकारी अध्यक्ष बलवंत पाटील, राज्य संघांचे कार्यकारी अध्यक्ष विलास चौगुले, यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
संघटनेच्या मागण्या.... - जुन्या अवघड क्षेत्रातील सर्व शिक्षकांना बदली संवर्ग ३ चा लाभ देण्यात यावा.- बदलीसाठी ३० जून च्या रिक्त जागा दर्शवल्या जाव्यात- बदली पात्र सेवाकालावधी सर्वांसाठी ३० जून धरावा.
अवघड क्षेत्रात अडकलेल्या शिक्षकांना दिलासा देण्यासाठी सदर परिपत्रकामध्ये दुरुस्ती करण्याची आग्रही मागणी ग्रामविकास विभागाकडे करण्यात आली आहे. -बाळासाहेब मारणे, राज्याध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघ.