पुणे : पुण्यातील हडपसर भागातल्या हमीद सुयोग बेंद्रे या विद्यार्थ्याने चक्क शरद पवारांना पत्र लिहिले आहे. साधना प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील बाईंची बदली झाली हे कळताच इयत्ता तिसरीमधील हमीदने शरद पवार यांना "ताई चांगले शिकवतात, त्यांची बदली करु नका, त्या आम्हाला ओरडत नाही" असे पत्र लिहले आहे. साधना प्राथमिक विद्यामंदिर शाळेच्या वर्गशिक्षिका शारदा देवडे या आहेत. त्या हमीदला या खूप प्रिय आहेत. त्या कधीही ओरडत नाहीत. खूप चांगलं शिकवतात. त्यांची बदली करू नका अशा भावना त्याने पत्रातून व्यक्त केल्या आहेत. या पत्राची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.
हडपसरच्या या शाळेचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. त्यामध्ये शारदा देवडे या मॅडमची बदली झाली आहे. त्या शाळा सोडून जाणार आहेत. त्यांची बदली होणार या दुःखात सर्व विद्यार्थ्यांना रडू कोसळल्याचे व्हिडिओतुन दिसत आहे. विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षकाबाबत एवढा आदर, प्रेम असणे ही अभिमानस्पद गोष्ट आहे. आता ताई शाळा सोडून चालल्या आहेत. हा विरह हमीदला सहन होत नाहीये. त्याचे शारदा मॅडमशी अतूट नाते जुळले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवण्याबरोबरच आपल्या मुलाप्रमाणे प्रेम दिले आहे. त्यामुळे मुलांना पुढंही याच शिक्षिका पाहिजेत. त्यांची बदली होऊ नये यासाठी हमीदसोबत अनेक विद्यार्थी आग्रही असल्याचे व्हिडिओमधून दिसून येत आहे.
पत्रात काय नमूद केलंय?
प्रति, माननीय शरद पवार साहेब अध्यक्ष रयत शिक्षण संस्था, सातारानमस्कार, माझे नाव-हमीद सुयोग बेद्रे. माझ्या शाळेचे नाव-साधना प्राथमिक विद्यामंदिर पुणे हडपसर-28 मी इयत्ता तिसरी मध्ये शिकत आहे. माझ्या वर्गशिक्षिका सौ. शारदा देवडे ताई आहेत. मला आज असे कळले आहे. की त्या मला उदया पासून शिकवायला येणार नाहीत. त्यांची बदली अचानक केली आहे. हे ऐकून मला खूप रडू आले. मग मी मम्माला पप्पांना विचारले. ताईंना परत आणायला करायला पाहिजे? त्यांनी सांगितलं की, तुम्ही आमच्या ताईंना परत आणू शकता. कारण ताई आम्हाला खूप छान शिकवतात. कधीही ओरडत नाही. म्हणून मला ताई याच शाळेत पाहिजे. माझी आपल्याला नम्र विनंती आहे. की ताईंची बदली करू नका. त्यांना आमच्यातच ठेवा.आपला,हमीद