तिखटमीठ लावलेल्या कांद्याच्या चटणीबरोबर चविष्ट खेकडा भजी; पावसाळ्यात खाण्याची मजा वेगळीच

By राजू इनामदार | Published: September 20, 2022 06:34 PM2022-09-20T18:34:47+5:302022-09-20T18:35:11+5:30

भरपूर फिरून आल्यावर भूक लागलेली असताना स्टार्टर म्हणून खायला सुरुवात करावी आणि मग तोंड खवळून जेवणासारखीच खावी

Tasty crab bhaji with spicy onion chutney The fun of eating in monsoon is different | तिखटमीठ लावलेल्या कांद्याच्या चटणीबरोबर चविष्ट खेकडा भजी; पावसाळ्यात खाण्याची मजा वेगळीच

तिखटमीठ लावलेल्या कांद्याच्या चटणीबरोबर चविष्ट खेकडा भजी; पावसाळ्यात खाण्याची मजा वेगळीच

Next

पुणे : भजी काय कुठेही मिळतात. चांगली भजी मात्र निवडक ठिकाणीच मिळतात. त्यातही खेकडा भजी तर फारच तुरळक ठिकाणी. ही भजी खायची तर पावसाळ्यात किंवा मग पाऊस पडत असतानाच. पावसाने मस्त चिंब झाले आहात, एखाद्या शेडखाली जागा दिसते म्हणून तिथे घुसता आणि तो निघतो नेमका भजी तयार करणारा. मग त्याला खेकडा भजी करायला सांगायची किंवा मग धरणाकाठी, तलावावर कुठे फिरायला म्हणून गेलात तर खेकडा भजी खाण्यासारखा आनंद नाही.

अशी असते तयारी

या भज्यांसाठी कांदा कसाही चिरून चालत नाही. त्याची म्हणून एक खास पद्धत आहे. कांदा तसा कापला तरच भजी खेकड्यासारखी होतील, नाहीतर मग काही मजा नाही. तर कांदा घ्यायचा. साल वगैरे काढून मोकळा करायचा व त्याचे गोलगोल पातळ स्लाईस तयार करायचे. ते नंतर हाताने मोकळे करायचे. प्रत्येक गोल मोकळा करायचा. मग थोडेसे पाणी घालून डाळीचे पीठ तयार करायचे. त्यातही पाणी वाढले की मग भजी बिघडलीच समजायची. त्या पिठात जिरे, लाल तिखट, मीठ जशी चव हवी असेल त्याप्रमाणे टाकायचे.

भजी तळताना

इतके सगळे झाले की मग पूर्वतयारी झाली समजायचे व कढईत तेल तापायला ठेवायचे. हाताच्या बोटांनी चिरलेल्या कांद्याचा थोडा भाग उचलायचा, तो डाळीच्या पिठात बुडवायचा व हलक्याच हातांनी कढईत सोडायचा. हे करणे ही एक कला आहे. त्याची सवय हवी. नाहीतर मग बोटांच्या चिमटीत कधी कांदा कमी येतो, तर कधी जास्त. डाळीच्या पिठात कांदा जास्त वेळ बुडाला की मग भज्यांची मजा गेलीच म्हणून समजा. खाताना मग पीठच जास्त लागते.

कुरकुरीत व्हावी म्हणून...

खेकडा भजी कुरकुरीत करायची असेल तर मग ती किती वेळ तळायची याचे पक्के गणित माहिती असायला हवे. पांढरट दिसणारी कच्ची राहतात तर एकदम चॉकलेटी रंगाची झाली असतील तर जळकट लागतात. त्यामुळे बरोबर सोनेरी रंगाची, अधूनमधून तेलात तळला गेलेला कांदा दिसणारी भजी खाण्यासाठी एकदम चांगली.

कशी खायची?

तळलेल्या, मिठात घोळलेल्या हिरव्या मिरचीबरोबर ही भजी खाणे म्हणजे चैनच. खडकवासला चौपाटीवर असलेल्या गाड्यांवर त्यासोबत कच्चा कांदा असलेली, तेलात तिखटमीठ लावलेली कांद्याची चटणी देतात. तीसुद्धा खेकडा भज्यांबरोबर चांगली लागते. भरपूर फिरून आल्यावर भूक लागलेली असताना स्टार्टर म्हणून खायला सुरुवात करावी आणि मग तोंड खवळून जेवणासारखीच खावी असा अनुभव ही भजी कायम देतात.

कुठे खाल?

खडकवासला धरण चौपाटीवर, सिंहगडावर,कधी मिळतात? : दिवसभर.

Web Title: Tasty crab bhaji with spicy onion chutney The fun of eating in monsoon is different

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.