महिलेचा अश्लील व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल ; एकाला अटक
By भाग्यश्री गिलडा | Updated: April 21, 2024 18:15 IST2024-04-21T18:15:07+5:302024-04-21T18:15:26+5:30
आरोपीने महिलेसोबत व्यवसायाच्या निमित्ताने ओळख वाढवून प्रेमसंबंध ठेवले होते

महिलेचा अश्लील व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल ; एकाला अटक
पुणे: महिलेचे अश्लील व्हिडीओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सोमनाथदत्तू सदाफुले (वय-३०, रा. मृद, लातूर) याला शनिवारी (दि. २०) सिंहगड पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव बुद्रुक परिसरात राहणाऱ्या ३९ वर्षीय महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार ही घटना एप्रिल २०२३ ते २० एप्रिल २०२४ यादरम्यानच्या काळात महिलेच्या राहत्या घरी घडली. फिर्यादी महिला आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे होते. आरोपी सोमनाथ याने फिर्यादी महिलेसोबत व्यवसायाच्या निमित्ताने ओळख वाढवून त्यांच्यासोबत प्रेमसंबंध ठेवले. त्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने व्हिडीओ कॉल करून महिलेला नग्न होण्यास भाग पाडून फिर्यादीच्या नकळत त्यांचे अश्लील व्हिडीओ काढले. हा प्रकार फिर्यादी महिलेला समजताच त्यांनी आरोपीसोबत संबंध ठेवण्यास आणि फोन करण्यास नकार दिला. याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादींना वारंवार फोन करून शिवीगाळ केली. तसेच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीरसागर हे करत आहेत.