रेमडेसिव्हिर आणि टॉसिलिझुमॅब औषधांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 20:37 IST2020-09-22T20:37:22+5:302020-09-22T20:37:55+5:30
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश: रेमडेसिव्हिर आणि टॉसिलिझुमॅब औषधांचा तुटवडा नाही

रेमडेसिव्हिर आणि टॉसिलिझुमॅब औषधांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा
पुणे : गेल्या काही दिवसांत पुण्यासह संपूर्ण राज्यातच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळेच कोरोना रूग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिव्हिर आणि टॉसिलिझुमॅब या औषधांचा तुटवडा असून, काळाबाजार सुरू झाला आहे. यामुळे सर्वसामान्य रुग्णांना मात्र भुर्दंड सहन करावा लागत आहे. याबाबत जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी रेमडेसिव्हिर आणि टॉसिलिझुमॅब औषधांचा कोणताही तुटवडा नाही. तसेच कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देशमुख यांनी दिले.
याबाबत जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात रेमडेसिव्हिर आणि टॉसिलिझुमॅब या औषधांचा साठा मर्यादित असला तरी ती पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. ज्या औषध वितरकांकडे ही औषधे उपलब्ध आहेत, त्यांची यादी जाहीर करण्यात येत आहे. औषध वितरणात होणारा गैरप्रकार रोखण्यासाठी संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी देशमुख यांनी दिला आहे.
या औषधांच्या गैरप्रकाराबाबत काही माहिती असल्यास नागरिकानी थेट अन्न व औषध प्रशासनाचा टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर देण्यात यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे पुणे विभागाचे सह आयुक्त सुरेश पाटील यांनी केले आहे.
----