पुणे : स्वारगेट बलात्कार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडेच्या न्यायालयीन कोठडीत दि.८ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांनी हा आदेश दिला. त्यामुळे गाडेचा येरवडा कारागृहातील मुक्काम असणार आहे. दरम्यान, आरोपी विरोधात येत्या आठवड्यात आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणेपोलिस प्रयत्नशील आहेत.स्वारगेट आगारात शिवशाही बसमध्ये आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३६) याने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी घडली. या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, आरोपीला २६ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्याची मुदत संपल्याने आरोपी गाडेला येरवडा कारागृहातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले.न्यायाधीशांनी गाडेला पोलिसांविरोधात काही तक्रार आहे का, अशी विचारणा केली. त्यावर कोणतीही तक्रार नसल्याचे त्याने सांगितले. न्यायालयाच्या परवानगीने आरोपीचे वकील ॲॅड वाजेद खान-बिडकर यांनी आरोपी गाडेला कारागृहात येऊन भेटून खटल्याबाबत सूचना घेणार असल्याचे सांगितले. पीडितेच्या वतीने ॲॅड. श्रीया आवले उपस्थित होत्या. दरम्यान, या प्रकरणात डीएनए चाचणी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. येत्या आठवड्यात हा अहवाल प्राप्त होण्याची शक्यता असून, त्यानंतर पोलिसांकडून आरोपपत्र दाखल केले जाणार आहे. या खटल्यात सरकार पक्षाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्तीचा प्रस्तावही पोलिसांनी दिला आहे.
स्वारगेट बलात्कार प्रकरणात आरोपी गाडेच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
By नम्रता फडणीस | Updated: March 27, 2025 16:37 IST