पीएमपीत आढळल्या संशयित बॅगा
By Admin | Updated: February 15, 2016 02:47 IST2016-02-15T02:47:27+5:302016-02-15T02:47:27+5:30
एका पीएमपी बसमधील सीटखाली दुपारी दोनच्या सुमारास आढळून आलेल्या दोन संशयित बॅगांमुळे सारसबागेजवळील स्वामी समर्थ मंदिराजवळ ही बस थांबवत सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले.

पीएमपीत आढळल्या संशयित बॅगा
पुणे : एका पीएमपी बसमधील सीटखाली दुपारी दोनच्या सुमारास आढळून आलेल्या दोन संशयित बॅगांमुळे सारसबागेजवळील स्वामी समर्थ मंदिराजवळ ही बस थांबवत सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. स्वा. सावरकर पुतळ्यापासून दांडेकर पुलाकडे जाणारी वाहतूक बंद करून बॉम्बशोधक व नाशक पथकाने तपासणी केली. तब्बल तासभर चाललेल्या या तपासणीमध्ये बॅगांमध्ये कपडे असल्याचे निष्पन्न झाल्यावर वाहतूक सुरू करण्यात आली.
स्वा. सावरकर पुतळा चौकाकडून दांडेकर पुलाकडे जात असलेल्या पीएमपी बसमधील सर्वांत पाठीमागील सीटखाली एक सुटकेस आणि एक काळ्या रंगाची बॅग बेवारस अवस्थेत आढळून आली. याची माहिती प्रवाशांनी बसचे चालक व वाहक यांना दिली. त्यांनी तातडीने स्वामी समर्थ मंदिराच्या बाजूला ही बस घेतली. प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. दरम्यान, पोलिसांना याची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दीपक निकम, दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीधर जाधव, सहायक निरीक्षक संदेश केंजळे, ए. एस. देशमाने आदी अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी स्वा. सावरकर पुतळा चौकाकडून येणारी वाहतूक थांबवली. मात्र दांडेकर पुलाकडून येणारी वाहतूक सुरळीत ठेवण्यात आली होती. बीडीडीएसचे पथक तत्काळ घटनास्थळी हजर झाले. सुरुवातीला श्वानपथकाच्या साहाय्याने बॅगांची तपासणी करण्यात आली. श्वानाने नकारात्मक इशारा केल्यानंतर स्कॅनरच्या मदतीने बॅगांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर बॉम्ब सूट परिधान केलेल्या कर्मचाऱ्यांनी बसमध्ये जाऊन या दोन्हीही बॅगा उघडून पाहिल्या. तेव्हा या बॅगांमध्ये कपडे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनेची नोंद केली असून, बॅगा ताब्यात घेतल्या आहेत. तासभर चाललेल्या या तपासणीनंतर बस रवाना करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.