खरीप हंगामासाठी भात बियाणे व खतांचा पुरवठा करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:17 IST2021-05-05T04:17:04+5:302021-05-05T04:17:04+5:30
भोर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बियाणे खते व औषधांची दुकाने बंद आहेत. शेतकऱ्यांना खरीब हंगामातील भाताच्या बियांची पेरणी ...

खरीप हंगामासाठी भात बियाणे व खतांचा पुरवठा करावा
भोर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बियाणे खते व औषधांची दुकाने बंद आहेत. शेतकऱ्यांना खरीब हंगामातील भाताच्या बियांची पेरणी करण्यासाठी खतांचा आणि औषधांचा पुरवठा करावा, अशी मागणी भोर पंचायत समितीचे उपसभापती लहु शेलार यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
भोर तालुक्यात पश्चिम भागात वळवाचे पाऊस झाल्यावर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात खरीब हंगामातील भाताचे बियाणे धूळ वाफेवर पेरले जातात. तर पूर्व जमिनीला वापसा आल्यावर भाताची पेरणी होते. मात्र सध्या १६ मे पर्यंत कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित केल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद आहेत. खते, बियाणे व औषधांची दुकानेही बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करण्याची मोठी अडचण होत आहे. त्यामुळे प्रशासनाने कोरोनाचे नियम पाळून तालुक्यात बियाणे व खतांची विक्रीला परवानगी द्यावी. भोर तालुक्यात भात हे प्रमुख पिक असून सुमारे ७,४०० हेक्टरवर भाताची लागवड केले जाते. पश्चिम भागातील शेतकऱ्यांना भात हे प्रमुख पिक असून भाताच्या पिकावर अनेकांचे उत्पन्नाचे साधन आहे. तालुक्यात पश्चिम भागातील निरा देवघर व भाटघर धरण भागातील शेतकरी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भाताच्या बियाणाची पेरणी करतात. त्यासाठी मे महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात बियाणे व त्यानंतर खताची खरेदी करतात. मात्र, सध्या दुकाने बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण होत आहे. त्यामुळे भोर तालुक्यात बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना दुकाने उघडायला आणी बियाणे, खते घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी भोर पंचायत समितीचे उपसभापती लहु शेलार यांनी उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांच्याकडे केली आहे.