विद्यार्थ्याची आत्महत्या
By Admin | Updated: October 27, 2015 01:16 IST2015-10-27T01:16:37+5:302015-10-27T01:16:37+5:30
कोथरूड परिसरातील पी. जोग शाळेसमोरील एका खासगी क्लासमध्ये शिकवणीसाठी येणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्याने पाचमजली इमारतीवरून उडी मारून सोमवारी आत्महत्या केली

विद्यार्थ्याची आत्महत्या
कर्वेनगर : कोथरूड परिसरातील पी. जोग शाळेसमोरील एका खासगी क्लासमध्ये शिकवणीसाठी येणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्याने पाचमजली इमारतीवरून उडी मारून सोमवारी आत्महत्या केली. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अभ्यासाचा ताण घेऊन त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
सौरभ शामराव भरेकर (वय १७, रा. सुतारदरा, पांडुरंग कॉलनी) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. सौरभ एमआयटी ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावी सायन्स शाखेत शिक्षण घेत होता. दीपा पाठक केमिस्ट्री क्लासेसमध्ये तो केमिस्ट्री विषयाच्या तयारीसाठी येत होता. सोमवारी सकाळी त्याच्या वडिलांनी क्लाससमोर सोडले. मात्र, क्लासमध्ये न जाता सौरभ क्लासच्या इमारतीच्या छतावर गेला. पाठीवरचे दप्तर आणि चप्पल बाजूला काढून ठेवून त्याने इमारतीवरून उडी मारली. क्लासच्या समोरच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे घर आहे. जावडेकर यांच्या सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी विनोद सोनवणे यांना नियुक्त करण्यात आले आहे. सोनवणे यांना सौरभच्या पडण्याचा आवाज आला. त्यांनी तत्काळ सौरभला रिक्षातून खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले; मात्र त्याचा मृत्यू झाला. सोनवणे यांनी सौरभच्या नातेवाइकांना रुग्णालायात बोलावून घेतले. सौरभचे वडील पेंटिंग कॉट्रॅक्टर असून आई महापालिकेत शिक्षण मंडळात शिपाईपदावर कामाला आहे. सौरभ त्यांचा एकुलता मुलगा होता.