पानशेत : आर्थिक परिस्थितीवर मात करीत जिद्द व चिकाटी, कठोर परिश्रमाच्या जोरावर धानेप (ता. राजगड) येथील सोनाली सुनील मळेकर ही सीए परीक्षा उत्तीर्ण झाली आहे.
लहानपणापासूनच अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या सोनालीने आपले प्राथमिक शिक्षण अत्यंत दुर्गम व डोंगरी भागातील आपल्या मूळ गावी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानेप येथे पूर्ण केले. सोनाली मळेकर हिने सीए होण्याचे स्वप्न अथक प्रयत्नांनी पूर्ण केले. जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन गरुडभरारी घेणाऱ्या सोनाली मळेकर हिने उराशी बाळगलेल्या स्वप्नांची पूर्तता करून जिद्दीच्या जोरावर यश मिळविता येते, हे दाखवून दिले. यावेळी सोनाली मळेकर म्हणाली की, माझे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्ण झाले. त्यावेळी माझ्या शिक्षकांकडून मला सीए परीक्षेविषयी लहानपणीच माहिती मिळाली होती. त्यामुळे बारावीनंतर मी सीए करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच प्रयत्नात पहिली परीक्षा उत्तीर्ण झाले, पण खरी कसोटी लागली ती पुढील परीक्षेत. अभ्यासात सातत्य ठेवत आई-वडिलांचे आशीर्वाद, शिक्षकांचे मार्गदर्शन व माझे प्रयत्न, या जोरावर सीए उत्तीर्ण झाले.