लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांच्या समर्थकांची व्यूहरचना, शिरूर लोकसभेसाठी १०० अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 16:23 IST2024-03-23T16:22:27+5:302024-03-23T16:23:15+5:30
प्रत्येक गावातून लोकसभा निवडणुकीसाठी किमान पाच उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहेत...

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांच्या समर्थकांची व्यूहरचना, शिरूर लोकसभेसाठी १०० अर्ज
चाकण (पुणे) : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकांनी आता सरकारला कोंडीत पकडण्यासाठी नवी योजना आखली आहे. त्यानुसार प्रत्येक गावातून लोकसभा निवडणुकीसाठी किमान पाच उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहेत. अशीच तयारी खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघामधून करण्यात आली आहे.
मराठा आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी खेड- आळंदी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने सकल मराठा समाजाची बैठक झाली. या बैठकीमध्ये सरकारने आरक्षणासंदर्भात घेतलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ शिरूर लोकसभा मतदारसंघामधून १०० हून अधिक उमेदवारी अर्ज भरण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्याप्रमाणे अनेकांनी नाव नोंदणी केली आहे.
राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देऊन त्या पूर्ण केल्या नाहीत. मनोज जरांगे यांनी केलेल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून सरकारने न मागितलेले दहा टक्के आरक्षण समाजाला देऊ केले आहे. याबाबत पुढील भूमिका ठरवण्यासाठी मनोज जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली अंतरवाली सराटीत बैठक होणार आहे. या बैठकीला खेड-आळंदी परिसरातून जास्तीत जास्त समाजबांधवांनी जाण्याचा निर्धार करण्यात आला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देऊन राज्य सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खेड- आळंदी विधानसभेतील शंभर उमेदवार आपले उमेदवारी अर्ज येणाऱ्या लोकसभेला भरणार असल्याचे अंकुश राक्षे यांनी सांगितले.