पुण्यात नवले ब्रिजजवळ विचित्र अपघात; भरधाव ट्रकची पाच वाहनांना धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 15:35 IST2020-11-02T15:34:22+5:302020-11-02T15:35:24+5:30
सांगलीवरून पनवेल येथे साखर घेऊन निघालेला ट्रकचे अचानक इंजिन बंद पडल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले.

पुण्यात नवले ब्रिजजवळ विचित्र अपघात; भरधाव ट्रकची पाच वाहनांना धडक
पुणे ( धायरी) : मुंबई-बंगळुरू महामार्गावर विचित्र अपघात घडला. ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे समोर असणाऱ्या पाच वाहनांना धडक दिली.या अपघातात एक जण किरकोळ जखमी झाला आहे , मात्र वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी सकाळी आठच्या सुमारास वडगांव बुद्रुक येथील हॉटेल विश्वास समोर घडली. ह्याबाबत ट्रकचालक चित्रपाल जंडल सिंग (वय२९, मूळ. मध्यप्रदेश, सध्या राहणार: सांगली) याच्याविरोधात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रकचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सांगलीवरून पनवेल येथे २५ टन साखर घेऊन निघालेला माल ट्रक ( एमएच-१२. एचडी. १८२८) सकाळी आठच्या सुमारास वडगाव पुलाजवळ आला असता अचानक इंजिन बंद पडल्याने ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे पुढे असणाऱ्या ३ चारचाकी वाहनांना व एका रिक्षाला तसेच एका दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला आहे. अशोककुमार शर्मा ( वय:३०, नऱ्हे,पुणे) असे जखमी व्यक्तीचे नाव असून त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने चारचाकी वाहनांमध्ये असणाऱ्या प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही. मात्र वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
उपाययोजनांकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष ?
नवीन कात्रज बोगदा ते वडगाव पुलादरम्यान महामार्गावर तीव्र उतार असून त्यासाठी तिथे वाहनांचा वेग कमी करण्यासाठी ५० अथवा १०० फुटापर्यंत पांढरे पट्टे करणे गरजेचे आहे. शिवाय ठिकठिकाणी फलक लावणे गरजेचे आहे. प्रशासनाने यासंदर्भात कोणत्याही प्रकारच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात केली नाही.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सुचविलेल्या उपाययोजनांकडे राष्ट्रीय महामार्ग प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष तर करत नाही ना? असा सवाल येथील नागरिक करीत आहेत.