भुलेश्वर - पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील आंबळे येथे दुपारी दोनच्या सुमारास ढवळेश्वर मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या रामवाडी येथील धनगर समाजातील सुभाष गुंडाजी शेंबडे यांचे जोरदार वाऱ्यामुळे घराचे छप्पर उडून दूरवर जाऊन पडले. यात त्यांचे एक लाख रुपयांदरम्यान नुकसान झाले. शासकीय यंत्रणेला कळवूनदेखील कोणत्याही प्रकारचा साधा पंचनामादेखील करण्यात आला नाही.सुभाष शेंबडे आपली आई, पत्नी व तीन मुलांसमवेत शेती करतात. दुपारी दोनच्या सुमारास अचानक मोठ्या प्रमाणात वारे वाहू लागले. वाऱ्याचा वेग इतका होता, की सुभाष शेंबडे यांच्या घराचे छप्पर उडून दूरवर जाऊन पडले. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.यावेळी त्यांच्या घरात त्यांची आई व लहान मुलगी होती. आई आजारी असल्याने दवाखान्यातून उपचार करून येऊन आराम करीत होती. जोरदार वारे घरात शिरताच त्यांनी व मुलीने दरवाजा लावण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र वारे घरात शिरले व घरांवर टाकण्यात आलेला लोखंडी पत्रा अँगल पाईपसह वर पन्नास ते साठ फूट उडून शंभर फूट लांब जाऊन पडला. यावेळी विटांची भिंत कोसळली. आतमधील आई व मुलगी यांना मात्र कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. गावातील तसेच दानशूर व्यक्तींनी सुभाष शेंबडे यांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र शामराव जगताप यांनी केले आहे.नुकसानभरपाई देण्याची मागणीमोठी मुलगी शेतात पाणी आणण्यासाठी गेली होती. तिने वादळ घरात शिरलेले व पत्रा उडालेला पाहिला. लहान भाऊ शेजारी खेळत होता, तर सुभाष शेंबडे यांच्या पत्नी शेतात कामासाठी गेल्या होत्या. यात त्यांचे लाखभर रुपयांचे नुकसान झाले असल्याने शासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी कुटुंबातील सदस्यांनी केली आहे.
आंबळेत वादळामुळे घराचे मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 01:28 IST