stop at home; Production of software to monitor home quarantine persons in Pune | घरातच थांबा ; पुण्यात होम क्वॉरंटाईन व्यक्तींवर लक्ष ठेवण्यासाठी सॉफ्टवेअरची निर्मिती  

घरातच थांबा ; पुण्यात होम क्वॉरंटाईन व्यक्तींवर लक्ष ठेवण्यासाठी सॉफ्टवेअरची निर्मिती  

ठळक मुद्देसंपर्कात आलेल्या व्यक्तींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांचीही मदत

पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता देशभरात लॉक डाऊन करण्यात आले आहे. शहरातही तब्बल २ हजार १९० जणांना ‘होम क्वॉरंटाईन’ करण्यात आलेले आहे. या सर्वांवर बारीक लक्ष ठेवण्यात येत असून त्याकरिता पोलिसांची मदत घेतली जात आहे. आता या संशयितांवर लक्ष ठेवण्याकरिता एका कंपनीच्या मदतीने पालिका सॉफ्टवेअरची निर्मिती करीत असून या अ‍ॅपद्वारे जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीमद्वारे त्यांच्यावर लक्ष ठेवणे सोईस्कर होणार आहे.

महापालिका, जिल्हा प्रशासन, पोलिसांकडून कलम १४४ कलमाची कडक अंमलबजावणी सुरु आहे. डॉ. नायडू रुग्णालयासह शहरातील ११ खासगी रुग्णालयांमध्ये संशयितांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले असून रुग्णांवर उपचारही सुरु आहेत. याशिवाय अनेकांना होम क्वॉरंटाईन करण्यात आलेले आहे. शहरामध्ये राज्यातील पहिला कोरोना रुग्ण आढळून आला होता. पहिले रुग्ण ठरलेल्या दाम्पत्याची मुलगी, त्यांच्या संपर्कात आलेला कॅब चालक आणि त्यांचा सह प्रवासी असे पाच जण बाधिक असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर एकामागे एक असे रुग्ण वाढत गेले. दरम्यान, पालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयामध्ये तपासणीकरिता नागरिक गर्दी करु लागले होते.

डॉ. नायडू रुग्णालयात दाखल झालेल्या संशयितांचा चौदा दिवसांचा देखरेखीचा कालावधी पूर्ण झाल्यावर नमुने तपासून घरी सोडण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णालयामधून घरी जाणाºयांनाही आणखी चौदा दिवसांकरिता होम क्वॉरंटाईन करुन ठेवण्यात येत आहे. होम क्वॉरंटाईन केलेल्यांवर लक्ष ठेवण्याकरिता पालिकेला सध्या जिकिरीचे जात आहे. पालिकेसमोर कोरोना संदर्भात करावयाच्या उपाययोजना आणि वैद्यकीय उपचारांसह अन्य बरीच कामे आहेत. त्यातच होम क्वॉरंटाईन केलेल्यांवरही लक्ष ठेवण्यात येत आहे.

पालिकेकडून यासाठी पोलिसांची मदत घेतली जात आहे. पोलीस ठाण्यांकडे होम क्वॉरंटाईन केलेल्यांची यादी, संपर्क क्रमांक आणि पत्ते देण्यात आलेले आहेत. पोलिसही दिवसभरात या नागरिकांना फोन करुन चौकशी करतात. पालिका आणि पोलिसांकडून त्यांना सतत फोन, व्हिडीओ कॉल्स आणि प्रत्यक्ष जाऊन चौकशी केली जात आहे. हे काम अधिक सोपे होण्याकरिता पालिकेला एक खासगी कंपनी  ‘सीएसआर’ मधून सॉफ्टवेअरची निर्मिती करुन देणार आहे. या अ‍ॅपद्वारे संशयित, घरी सोडलेले रुग्ण यांच्यावर लक्ष ठेवणे, त्यांच्या दैनंदिन हालचाली, दैनंदिन आरोग्य आणि सुधारणा याची माहिती मिळणार आहे. येत्या काही दिवसातच हे अ‍ॅप पालिकेला प्राप्त होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: stop at home; Production of software to monitor home quarantine persons in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.