राज्याला चांगली सौंदर्यदृष्टी असणाऱ्यांची गरज : रवी परांजपे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 13:22 IST2019-12-02T13:22:02+5:302019-12-02T13:22:24+5:30

सौंदर्यदृष्टी नसेल तर, लोकशाही प्रक्रिया अपूर्ण

The state needs people with good aesthetics: Ravi Paranjpe | राज्याला चांगली सौंदर्यदृष्टी असणाऱ्यांची गरज : रवी परांजपे

राज्याला चांगली सौंदर्यदृष्टी असणाऱ्यांची गरज : रवी परांजपे

ठळक मुद्देसेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचा प्रारंभ

पुणे : चित्रकला ही प्रत्येकाच्या जीवनात असणे गरजेचे आहे. चित्रकलेचा संबंध माणसाच्या सौंदर्यदृष्टीशी असतो. सौंदर्यदृष्टी नसेल तर, लोकशाही प्रक्रिया अपूर्ण आहे, हे सिद्ध झाले आहे. राज्याला आणि देशाला चांगली सौंदर्यदृष्टी असणाऱ्यांची आवश्यकता आहे. सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहातील या चित्रकला स्पर्धेला राष्ट्रीय स्तराचे महत्त्व असून याद्वारे चित्रकला व सौंदर्यदृष्टीतून लोकशाही बळकट होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन चित्रकार रवी परांजपे यांनी व्यक्त केले.
कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सि. धों. आबनावे कला महाविद्यालयातर्फे सारसबागेमध्ये राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सप्ताहाचे मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी, डॉ. विकास आबनावे, सचिन तावरे, प्रेमलता आबनावे, प्रथमेश आबनावे, पुष्कर आबनावे, गौरव आबनावे, प्रज्योत आबनावे, योगेश आबनावे, प्रशांत सुरसे, चेतन अगरवाल, भोला वांजळे, कल्याणी साळुंखे, रुपाली राऊत, भागोजी शिखरे आदी उपस्थित होते. स्पर्धेचे यंदा १५ वे वर्ष आहे.
मोहन जोशी म्हणाले, चित्रकला हे मनातील भावना कॅनव्हासवर उमटविण्याचे उत्तम साधन आहे. यामुळेच आपल्याला आत्मिक आनंद मिळतो. आपल्या स्वप्नातील चित्र कॅनव्हासवर रंगविण्यात प्रत्येकालाच विलक्षण आनंद वाटतो. शालेय शिक्षणासोबतच कला, क्रीडा क्षेत्रातील प्राविण्य देखील गरजेचे आहे. त्यामुळे असे उपक्रम सप्ताहात राबविण्यात येत आहेत. राज्यभरातून १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत सहभागी होण्याकरिता एकत्र येणे हा आगळावेगळा उपक्रम आहे. सामाजिक विषय मुलांना देऊन चित्रकलेच्या माध्यमातून सामाजिक जाणीवेचे संस्कार घडविण्याचे काम कलेच्या माध्यमातून केले जात आहे़
डॉ. विकास आबनावे म्हणाले, पाणी वाचवा पाणी जिरवा, स्वच्छता अभियान यासारख्या विषयावर आपल्या कल्पनाशक्तीतून नाविण्यपूर्ण चित्रे कॅनव्हासवर रेखाटत बालचित्रकारांनी सामाजिक संदेश दिला. राज्यातील २७३ कला महाविद्यालये आणि पुण्यातील १४३ शाळांतील सुमारे १ लाख ३० हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला़ सर्वसाधारण मुलांसोबत दृष्टिहीन मुलींनी, पालक व ज्येष्ठ नागरिकांनी स्पर्धेत सहभाग घेतला.
चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता घोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी येथे होणार आहे. या वेळी चित्रकार मुरली लाहोटी यांच्यासमवेत विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या वेळी सर्वोत्तम चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येईल. 

Web Title: The state needs people with good aesthetics: Ravi Paranjpe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.