Pune Crime: पार्टीत वाद झाल्याने चाकूने वार करून खून; आरोपीला सशर्त जामीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 11:56 IST2024-03-28T11:56:03+5:302024-03-28T11:56:44+5:30
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जमादार यांनी हा आदेश दिला...

Pune Crime: पार्टीत वाद झाल्याने चाकूने वार करून खून; आरोपीला सशर्त जामीन
पुणे : मद्य प्राशन करतेवेळी एकमेकांशी बाचाबाची होऊन झालेल्या भांडणात चाकूने वार करून खून केल्या प्रकरणात आरोपीला २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मिळाला आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जमादार यांनी हा आदेश दिला.
तपीन दिलीप विश्वकर्मा असे जामीन मंजूर केलेल्याचे नाव आहे. ही घटना ६ नोव्हेंबर २०२१ रोजी घडली. या केसमध्ये तीन आरोपी आहेत. हे आरोपी घटनेच्या दिवशी रात्री ८ वाजल्यापासून एका मैदानात मद्य प्राशन करीत होते. रात्री सव्वादहा वाजता आरोपी दोघांनी चाकूने वार केले. आरोपी विश्वकर्मा याने जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. आरोपीचे बाजूने ॲड. गणेश गुप्ता यांनी युक्तिवाद केला की, ही घटना क्षणार्धात घडली. त्याने असे सादर केले की, सर्व सहआरोपी दारूचे सेवन करत होते आणि आरोपी आणि मृत व्यक्ती यांच्यात बाचाबाची झाली आणि त्या भांडणात अर्जदाराने मृत व्यक्तीला मारहाण केली. आरोपीला कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. यातच प्रत्यक्षात घटना ६ नोव्हेंबर २०२१ रोजी घडली आणि ७ नोव्हेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला.
त्याच दिवशी आरोपीला अटक करण्यात आली. आरोपपत्र ४ फेब्रुवारी २०२२ रोजी दाखल करण्यात आले. आजपर्यंत खटल्यात कोणतीही प्रगती झालेली नाही. आरोपपत्रानुसार, फिर्यादी पक्षाकडून २५ साक्षीदार तपासण्यासाठी प्रस्तावित आहेत. त्यानुसार या खटल्याला बराच वेळ लागण्याची शक्यता आहे. ॲड. गुप्ता यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला सशर्त जामीन मंजूर केला. ॲड. गणेश गुप्ता, ॲड. दीपक गुप्ता, ॲड. साहिल घोरपडे, ॲड. मदन खानसोले आणि ॲड. जागृत पाटील यांनी काम पाहिले.