इंधन भडक्यामुळे एसटीचे तिकिटदर वाढणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 18:14 IST2018-05-23T18:14:15+5:302018-05-23T18:14:15+5:30
एसटीला यावर्षी केवळ इंधन दरवाढीमुळे ४६० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.

इंधन भडक्यामुळे एसटीचे तिकिटदर वाढणार !
पुणे : दररोज काही पैशांनी होणाऱ्या डिझेलच्या भाववाढीमुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळासमोर (एसटी) आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे तिकिट दरवाढीचा गांभीर्याने विचार सुरु केला असल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली. गेले काही महिने सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या भावात वाढ होत आहे. कर्नाटक निवडणुकी दरम्यानचा पंधरवडा सोडल्यास इंधनदरवाढ सुरुच आहे. कर्नाटक निवडणुकीनंतर गेल्या आठ दिवसांत डिझेलच्या दरात लिटर मागे २ रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. मंगळवारी (दि. २२) डिझेलचा प्रतिलिटर भाव ७१.२३ रुपये इतका होता. मे २०१७ मध्ये एसटीला मिळणाऱ्या डिझेलचा दर सरासरी ५८.०२ इतका होता. तो यंदाच्या मे महिन्यात सरासरी ६९.३९ रुपये प्रतिलिटर झाला झाला आहे. त्यामुळे प्रति लिटर १०.३८ रुपये इतके जादा पैसे एसटीला मोजावे लागत आहेत. वाढत्या डिझेल किंमतीमुळे दिवसेंदिवस इंधन खर्चात वाढ होत असून तब्बल २ हजार ३०० कोटी रुपयांचा संचित तोटा सोसणाऱ्या एसटीला यावर्षी केवळ इंधन दरवाढीमुळे ४६० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले. याचबरोबर तितकाच आर्थिक भार एसटीतील सुमारे १ लाख कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीमुळे भविष्यात सहन करावा लागणार आहे. या शिवाय महामार्गावरील टोलदरवाढीचा अतिरिक्त भारही एसटीवर पडत आहे. गेली सहा महिने सातत्याने डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ होत असून देखील केवळ ऐन गर्दीच्या हंगामात प्रवाशांना तिकिट दरवाढीची झळ बसू नये म्हणून एसटीने आतापर्यंत तिकिट दरवाढ करण्याचे टाळले आहे. यापूर्वी जुलै -आॅगस्ट २०१४ मध्ये एसटीची तिकिट भाडेवाढ झाली होती. आता मात्र सातत्याने होणाऱ्या डिझेल भाववाढीमुळे नाईलाजास्तव तिकिट भाडेवाढ करणे भाग पडत आहे. वरील सर्व घटकांचा विचार करुन एसटी प्रशासन लवकरच आपोआप भाडेवाढीच्या सूत्रानुसार तिकीट भाडेवाढ करण्याच्या विचारात आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.