पुणे: पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने सार्वजनिक जागी थुंकणे, कचरा जाळणे, अस्वच्छता करणे, अशा कारणांसाठी दंडात्मक कारवाई केली जाते. त्यानुसार गेल्या २२ महिन्यांत १५ क्षेत्रीय कार्यालयांनी १ लाख १३ हजार २७७ लोकांना दंड करत ७ कोटी ६ लाख ७ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
पुणे महापालिकेने सार्वजनिक जागी स्वच्छता राखण्यासाठी स्वच्छता उपविधी तयार केली आहे. त्या नियमानुसार अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. यामध्ये सार्वजनिक जागी थुंकणे, लघवी करणे, कचरा जाळणे, कचऱ्याचे सुका आणि ओला असे वर्गीकरण न करणे, नदीत राडारोडा टाकणे, अशा गोष्टींचा समावेश आहे. यासाठी १८० रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. यानुसार महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग कारवाई करत आहे. २०२३ च्या ऑक्टोबर महिन्यापासून २०२५च्या ऑगस्टपर्यंत म्हणजे २२ महिन्यांत कारवाई केल्याची ही आकडेवारी आहे.
सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याबद्दल २२५७ लोकांकडून २२ लाख ६५ हजार दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी लघवी करणाऱ्या ११ हजार ३३१ जणांकडून २२ लाख ८० हजार रुपये वसूल केले. कचरा जाळणाऱ्या १हजार ४८६ लोकांकडून १२ लाख २६ हजार वसूल करण्यात आले. कचऱ्याचे वर्गीकरण न केल्याबद्दल ६ हजार ८१७ लोकांकडून १६ लाख ७६ हजार रुपये वसूल करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या ८५ हजार ६९४ लोकांकडून ४ कोटी रुपयांचा रुपये वसूल करण्यात आले. बल्क वेस्ट जनरेटर कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद बाबत २२२ जणाकडून १३ लाख २५ हजार वसूल केले. बांधकाम राडारोडा टाकणाऱ्या १ हजार ०६४ लोकांकडून ५६ लाख ८६ हजार २५० रुपये वसूल करण्यात आले आहेत. २ हजार ४०० लोकांवर प्लॅस्टिक कारवाई करत १ कोटी २१ लाख ९५ हजार वसूल करण्यात आले. त्यांच्याकडून ९ हजार ८७६ किलो प्लॅस्टिक जमा करण्यात आले आहेत.
सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवणे ही नागरिकांचीदेखील जबाबदारी आहे. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, अस्वच्छता करणे, कचरा जाळणे टाळावे; अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल. - संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग, पालिका