SPPU: ललित कला केंद्रातील ‘नाट्या’बाबत पुणे विद्यापीठाची दिलगिरी; सत्यशोधन समिती गठित

By श्रीकिशन काळे | Published: February 3, 2024 06:58 PM2024-02-03T18:58:35+5:302024-02-03T18:59:12+5:30

विद्यार्थी जे सादर करत होते, तो त्या विभागाच्या परीक्षेचा प्रायोगिक भाग होता आणि हा प्रकार प्रहसनाचा असल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच झालेल्या प्रकाराबद्दल त्यांनी दिलगीरीही व्यक्त केली....

SPPU: Pune University apologizes for 'play' at Fine Arts Centre; Fact finding committee formed | SPPU: ललित कला केंद्रातील ‘नाट्या’बाबत पुणे विद्यापीठाची दिलगिरी; सत्यशोधन समिती गठित

SPPU: ललित कला केंद्रातील ‘नाट्या’बाबत पुणे विद्यापीठाची दिलगिरी; सत्यशोधन समिती गठित

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात शुक्रवारी (दि.२) ‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांनी ‘जब वी मेट’ याचा प्रयोग बंद पाडून तेथील विद्यार्थ्यांना धक्काबुक्की, मारहाण केली. या प्रयोगामध्ये सीता, रावण, लक्ष्मणाचे पात्र होते आणि त्यांच्या तोंडी शिव्या, आक्षेपार्ह भाषा होती. त्यामुळे प्रयोग बंद पाडून भावना दुखवल्याबद्दल संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. विद्यार्थी जे सादर करत होते, तो त्या विभागाच्या परीक्षेचा प्रायोगिक भाग होता आणि हा प्रकार प्रहसनाचा असल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच झालेल्या प्रकाराबद्दल त्यांनी दिलगीरीही व्यक्त केली.

ललित कला केंद्रामध्ये दि. २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० नंतर विभागाच्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत प्रात्याक्षिक परीक्षेचा भाग म्हणून प्रायोगिक नाटकाचे सादरीकरण केले जात होते. ‘जब वी मेट’ या नाटकाच्या सादरीकरणातील काही आशय/वक्तव्य आक्षेपार्ह असल्याचे दिसून येत आहे. या विषयी विद्यार्थ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन काही हातापायी झाल्याचे समजले. यानंतर सुरक्षा यंत्रणांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यानंतर पोलीस पाचारण केले व त्यावर तक्रार दाखल करून घेतली.

पोलीस प्रशासनाकडून याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली जात आहे. विद्यापीठामधील कायदा आणि सुव्यवस्था कोणीही हातात घेऊ नये ही विद्यापीठाची भूमिका आहे. या घटनेमुळे अनेकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असल्याबाबत विद्यापीठाकडे विविध संघटनांकडून निवेदने प्राप्त झाली आहेत. कोणत्याही व्यक्तीचे, महापुरूषाचे तसेच ऐतिहासिक व्यक्तीचे विडंबन करणे हे पूर्णत: गैर असून, निषेधार्ह आहे. विद्यापीठ अशा कोणत्याही गोष्टीचे समर्थन करत नाही. यामध्ये कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर विद्यापीठ दिलगीरी व्यक्त करत आहे.

या प्रकरणी विद्यापीठाने सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती गठित केली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या संदर्भात विहित नियमानूसार तातडीने आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्टीकरण विद्यापीठाने निवेदनाद्वारे प्रसिध्दीस दिले आहे.

Web Title: SPPU: Pune University apologizes for 'play' at Fine Arts Centre; Fact finding committee formed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.