सेवानिवृत्त पोलिसांच्या मदतीसाठी विशेष योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:14 IST2021-02-05T05:14:19+5:302021-02-05T05:14:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सेवानिवृत्त होणाऱ्यांना इतर क्षेत्रांमध्ये काम करण्याची इच्छा व गरज आहे. त्यांना त्या क्षेत्रामध्ये काम ...

सेवानिवृत्त पोलिसांच्या मदतीसाठी विशेष योजना
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सेवानिवृत्त होणाऱ्यांना इतर क्षेत्रांमध्ये काम करण्याची इच्छा व गरज आहे. त्यांना त्या क्षेत्रामध्ये काम उपलब्ध करुन देण्यासाठी सक्रीय मदत करण्यासाठी योजना सुरु करीत असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी जाहीर केले.
पोलीस दलामध्ये प्रदीर्घ सेवा बजावून ३१ डिसेंबर २०२० व जानेवारी २०२१ मध्यये सेवानिवृत्त होणार्या ३ पोलीस अधिकारी व १४ पोलीस अंमलदार यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम शनिवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
अमिताभ गुप्ता म्हणाले, या योजनेसाठी सर्व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांची वैयक्तिक माहिती त्यांच्याकडे असलेल्या विशेष कौशल्या व कोणत्या क्षेत्रात काम करायचे आहे. याबाबतची माहिती संकलित करुन त्यांचा बायोडाटा एकत्रित करण्यात येणार आहे. शहरातील वेगवेगळ्या उद्योजकांशी व कंपन्यांशी संपर्क साधून, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या पात्रतेप्रमाणे त्यांना नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी संपर्क साधणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला अपर पोलीस आयुक्त जालिंदर सुपेकर, अशोक मोराळे, उपायुक्त मितेश घट्टे, स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर, पोलीस निरीक्षक विजय पुराणिक यांनी प्रस्तावना केली. सहायक पोलीस आयुक्त वाकुडे, सहायक निरीक्षक बिस्ते, निवृत्त पोलिसांचे जावई ॲड. वैभव माेगणे, मुलगी एश्वर्या तानाजी निकम, श्रावणी संभाजी निकम यांनी मनोगत व्यक्त केले. गुप्ता यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.