दौंड – सोनवडी (ता. दौंड) येथील सागर प्रल्हाद काची (वय ३७) या युवकाचा गिअन बरे सिंड्रोम (GBS) या दुर्मिळ आजारामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना १७ फेब्रुवारी रोजी त्याचा मृत्यू झाला. मात्र, या मृत्यूची अधिकृत माहिती अद्याप दौंड तालुका आरोग्य कार्यालयाला मिळालेली नाही, त्यामुळे आरोग्य विभाग संभ्रमात आहे. ससून रुग्णालयाने संबंधित मृत्यू अहवाल तालुका आरोग्य कार्यालयाला पाठवणे बंधनकारक आहे. मात्र, तीन दिवस उलटल्यानंतरही हा अहवाल आरोग्य विभागाकडे पोहोचलेला नाही.तरीही, प्राथमिक माहितीच्या आधारे सागर काची याचा मृत्यू जीबीएसमुळे झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोग्य विभागाने नागरिकांना स्वच्छ पाणी पिण्याच्या सूचना दिल्या आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उल्का जाधव यांनी सांगितले की, "नागरिकांनी पाणी उकळून प्यावे आणि बाहेरचे अन्न टाळावे. बाहेरचे अन्न आरोग्यास हानिकारक ठरू शकते." तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना या संदर्भात सूचना देण्यात आल्या असून, ग्रामस्थांना जनजागृती केली जात आहे. शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी स्वच्छता आणि सुरक्षित पाणी पिण्याच्या सवयी अंगीकारण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
सोनवडीच्या युवकाचा जीबीएसने मृत्यू; आरोग्य विभाग संभ्रमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 18:15 IST