पत्नीला भेटायला गेलेल्या जावयाला डोके फुटेपर्यंत मारले, गुन्हा दाखल; पुण्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 18:09 IST2023-12-12T18:06:52+5:302023-12-12T18:09:07+5:30
याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे....

पत्नीला भेटायला गेलेल्या जावयाला डोके फुटेपर्यंत मारले, गुन्हा दाखल; पुण्यातील घटना
धनकवडी (पुणे ) : पत्नीला भेटण्यासाठी सासुरवाडीत येणं एका जावयाला चांगलेच महागात पडले आहे. सासरकडच्या लोकांनी संगनमत करुन घरगुती भांडणावरून जावयाला डोके फुटेपर्यंत बेदम मारहाण केली. यामध्ये जावई गंभीर जखमी झाला. हा प्रकार धनकवडी परिसरात घडला आहे. रविवारी (दि.10) दुपारी दोनच्या सुमारास धनकवडी येथील मयुर कॉम्प्लेक्समध्ये ही घटना घडली. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत राजेश तुळसीराम उणेचा (वय-34 रा. कुलभुषण सोसायटी, बिबवेवाडी-कोंढवा रोड, पुणे) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन सासू हेमलता मुलचंद डांगी (वय-50), सासरे मुलचंद पुकराज डांगी (वय-55), मेहुणा प्रथमेश मुलचंद डांगी आणि पुजा मुलचंद डांगी (सर्व रा. मयुर कॉम्प्लेक्स, धनकवडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेश उणेचा हे पत्नीला भेटण्यासाठी धनकवडी येथे सासुरवाडीला गेले होते. त्यावेळी सासरच्या लोकांनी संगनमत करुन घरगुती कारणावरुन फिर्यादी यांच्या सोबत वाद घातले. यानंतर त्यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तर सासू हेमलता डांगी यांनी कोणत्यातरी जड वस्तूने फिर्यादी यांच्या डोक्यात मारहाण करुन गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहकारनगर पोलीस करीत आहेत.