एकपात्री प्रयोग म्हणजे परकाया प्रवेश : डॉ. नीलेश साबळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 19:07 IST2019-07-06T19:04:51+5:302019-07-06T19:07:50+5:30
राम नगरकरांसारख्या एकपात्री कलाकाराने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसविले. कारण त्यांचा विनोद हा निरागस विनोद होता..

एकपात्री प्रयोग म्हणजे परकाया प्रवेश : डॉ. नीलेश साबळे
पुणे:- एकपात्री प्रयोग हे दुसरे-तिसरे काही नसून, परकाया प्रवेशाचाच अनुभव असतो. तुम्हाला त्यातील पात्रं अंगात भिनवावे लागते, पचवावे लागते, त्याच्याशी एकरुप व्हावे लागते, तेव्हाच ते रसिकांच्या हृदयाचा ठाव घेते,अशा शब्दांत प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, निवेदक, अभिनेता डॉ. नीलेश साबळे यांनी एकपात्री कलाकाराचे विश्व उलगडले.
राम नगरकर कला अकादमीतर्फे देण्यात येणारा राम नगरकर कला गौरव पुरस्कार डॉ. नीलेश साबळे यांना ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि लीड मीडियाचे संस्थापक अध्यक्ष विनोद सातव, तसेच राम नगरकर कला अकादमी,पुणेचे अध्यक्ष वंदन राम नगरकर, उपाध्यक्ष उदय राम नगरकर, सचिव संध्या नगरकर-वाघमारे, सहसचिव मंदा नगरकर-हेगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
राम नगरकरांसारख्या एकपात्री कलाकाराने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसविले. कारण त्यांचा विनोद हा निरागस विनोद होता आणि निरागस विनोद रसिकांना भावतो. भोर, सासवडहून सुरू झालेल्या माझ्या प्रवासात राम नगरकरांच्या हऱ्या नाऱ्या झिंदाबाद, विच्छा माझी पुरी करा या नाटकांनी सोबत केली. राम नगरकरांच्या सादरीकरणाचा माझ्यावर प्रभाव असल्याची भावना डॉ. साबळे यांनी व्यक्त केली.
मी गडहिंग्लजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असताना सांस्कृतिक विभागाचा प्रमुख झालो. कारण सुरुवातीपासूनच शुटिंग, कलाकार याविषयी मला खूप आकर्षण होते. या क्षेत्रामध्येच काहीतरी करून दाखविण्याची उर्मी मला शांत बसू देत नव्हती. रंगमंचावर वावरण्यासाठी एकपात्री हे माध्यम मी निवडले, त्यावेळी या क्षेत्रात नावाजलेल्या व्यक्तींचा अभ्यास करू लागलो. त्यात राम नगरकरांचे स्थान प्रामुख्याने प्रथम स्थानावर येते. राम नगरकरांचे लेखन जणू माझ्या साठीच होते, अशा पद्धतीने मी गावोगावी त्याचे एकपात्री प्रयोग करू लागलो. आजही माझे आई-वडील, माझे कुटुंब हे माझे प्रेक्षक असतात. त्यांना माझा कार्यक्रम आवडला, तर तो संपूर्ण महाराष्ट्राला आवडेल, याची खात्री मला मिळते असेही ते म्हणाले.
सुधीर गाडगीळ यांनी सध्या सूत्रसंचालन करीत असलेल्या प्रसिद्ध कार्यक्रमात पुरूषांना स्त्रियांचा वेश घालून कला सादर करण्याचे प्रमाण कमी केल्यास सर्व स्तरातील प्रेक्षकांचे प्रेम त्यांना मिळेल, असा खास पुणेरी शैलीत प्रेमळ सल्ला नीलेश साबळे यांना यावेळी दिला.प्रास्ताविक वंदन राम नगरकर यांनी केले. सूत्रसंचालन संतोष चोरडिया यांनी केले.