समाजाने जागते व्हावे

By Admin | Updated: February 16, 2016 01:08 IST2016-02-16T01:08:17+5:302016-02-16T01:08:17+5:30

शिक्षण पद्धती बदलण्याच्या दृष्टीने शिक्षण नीती तयार करण्याचे काम सरकार करीत आहे. शासन, प्रशासन हलतील, तेव्हा हलतील.

Society can be awake | समाजाने जागते व्हावे

समाजाने जागते व्हावे

पिंपरी : शिक्षण पद्धती बदलण्याच्या दृष्टीने शिक्षण नीती तयार करण्याचे काम सरकार करीत आहे. शासन, प्रशासन हलतील, तेव्हा हलतील. मात्र, समाजाने जागते व्हावे. आत्महीनता नव्हे, तर आत्मगौरव निर्माण करणारे शिक्षण हवे आहे. देशातील शिक्षण क्षेत्रातील प्रयोगांचा समावेश शिक्षानीतीत करावा, अशी अपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी चिंचवड येथील कार्यक्रमात सोमवारी केली.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम आयोजित एकादश प्रारंभ सिंहावलोकन महोत्सवात ते बोलत होते. व्यासपीठावर क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती अध्यक्ष गिरीश प्रभुणे, कार्यवाह अ‍ॅड. सतीश गोरडे आदी उपस्थित होते.
या वेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, ज्येष्ठ अभ्यासक डॉ. प्रभाकर मांडे, मुकुल कानिटकर (नागपूर), रवींद्र शर्मा, (आदिलाबाद), इंदुमती काटदरे (अहमदाबाद), महेश शर्मा (झाबूआ), विश्वेश्वर शास्त्री द्रविड (वाराणसी), हेमेंद्र शहा, शांतीलाल मुथा, डॉ. वामनराव गोगटे (पुणे), सुनील देशपांडे (लवादा), रमेश पतंगे (मुंबई), डॉ. भीमराव गस्ती (बेळगाव), लक्ष्मीबाई गोरडे, शशिकला मेहता (पिंपरी-चिंचवड) यांचा गौरव करण्यात आला.
‘दहा वर्षांपूवी याच ठिकाणी मी कार्यक्रमास आलो होतो, त्या वेळी केलेली कल्पना आज साकारताना दिसत आहे. शिक्षण क्षेत्रातला हा उत्तम प्रयोग आहे,’ असे सांगून भागवत म्हणाले, ‘‘मानवाच्या मुलांना शिक्षण देणे आवश्यक असते. पशूंना शिक्षण द्यावे लागत नाही. ते सहज सान्निध्याने उपलब्ध होते. मरेपर्यंत जीवन बऱ्यापैकी जगला, अशा व्यक्तीला काहीही विचार नसतो. त्याच्यापुढे आत्महत्येचाही विचार नसतो. जगतो की मरतो, याचेही त्याला काही घेणे-देणे नसते. विचार नावाची प्रवृत्ती पशूंना नसते. ती माणसाला असते. सगळीच माणसं माणसासारखी जगतातच, असे नाही. त्यांना माणसासारखे जगायला शिकवावे लागते. संवेदनाक्षम मन, सर्वगामी विवेकी बुद्धी, प्रतिभा ज्ञान, करुणा, आत्मीयता शिक्षणातून मिळायला हवी.’’
भटक्या समाजाचा विसर पडला
भागवत म्हणाले, ‘‘भटका समाज आमचा आहे, याचा आम्हालाच विसर पडला. लढणारे हे लोक आहेत. सत्ताकारणी लोकांनी अशा स्वाभिमानी लोकांचे खच्चीकरण करण्याचे काम केले म्हणून काही जण उत्तर जहाजातून दूर देशी जाऊन तिथे नवा भारत उभा केला. देशातच राहिले त्यांना याद्यांतून काढून टाकले. अशा समाजांना पुनरपी आत्मीयता, अनुभव देऊन त्यांना आत्मगौरव मिळू देण्यासाठी प्रयत्न करायला हवा.’’
आळशी पुंडलिक नसावा
‘जगात मान उंचावण्यालायक काही निर्माण झालं, त्यात मी होतो. हे भाग्य आपल्या ठायी येण्यासाठी प्रयत्न करावा. ‘पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा’ यानुसार पुंडलिका भेटी परब्रह्म आले. परंतु, पुंडलिक निर्बुद्ध, आळशी असेल तर, असे भागवत यांनी म्हणताच हास्यलाट उसळली.
क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने पुनरुत्थान समरसता गुरुकुलमची स्थापना दहा वर्षांपूवी झाली. भटक्या विमुक्त जातीतील मुलांना गुरुकुल पद्धतीने शिक्षण दिले जाते. सध्या ३५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या उपक्रमाचे यंदाचे दहावे वर्ष आहे. त्या निमित्ताने एकादश प्रारंभ सिंहावलोकन महोत्सव झाला. शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. संस्था आणि व्यक्तींचा गौरवही करण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Society can be awake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.