Social Trend | जगण्याचेच प्रश्न गंभीर असताना रंगाचा मुद्दाच निरर्थक!

By अतुल चिंचली | Published: December 21, 2022 10:09 AM2022-12-21T10:09:56+5:302022-12-21T10:12:02+5:30

देशात महागाई, रोजगार, आरोग्य, शिक्षण, मूलभूत गरजा असे अनेक प्रश्न असताना रंगाचा मुद्दा का समाजासमोर आणला जातोय, असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे...

Social Trend When the issue of survival is serious, the issue of color is meaningless | Social Trend | जगण्याचेच प्रश्न गंभीर असताना रंगाचा मुद्दाच निरर्थक!

Social Trend | जगण्याचेच प्रश्न गंभीर असताना रंगाचा मुद्दाच निरर्थक!

Next

पुणे : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा पठाण चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटातील बेशरम रंग हे गाणे नुकतेच रिलीज झाले. या गाण्यात दीपिकाने परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून वादाला ताेंड फुटले. हिंदू संघटनांकडून भगव्या रंगाला तीव्र विरोध सुरू आहे. तर अभिनेते, अभिनेत्रींकडून या गाण्याचे समर्थन केले जात आहे. सामान्य माणसांनी मात्र हा मुद्दाच निरर्थक असल्याचे म्हटले आहे.

जनतेच्या नावाखाली भलतेच लोक आवाज उठवू लागले आहेत. यावरून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या. देशात महागाई, रोजगार, आरोग्य, शिक्षण, मूलभूत गरजा असे अनेक प्रश्न असताना रंगाचा मुद्दा का समाजासमोर आणला जातोय, असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

भाजप, हिंदू संघटना लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी जाणूनबुजून असा खोडसाळपणा करत असल्याची टीकाही काहींनी केली आहे. पूर्वीच्या अनेक चित्रपटांत भगवे कपडे घातले आहेत. त्यावेळी राजकीय नेते आणि महंत झोपले होते का? असा प्रश्न उपस्थित करत माधुरी दीक्षितच्या धक धक करने लगा, या गाण्याचे उदाहरण दिले जात आहे.

खरेतर कपड्याच्या रंगावर बोलण्यापेक्षा नेते मंडळींनी कमी कपड्यावर बोलायला पाहिजे होते. कारण, कोणीही नेत्याची मुलगी हा ड्रेस घालून प्रचार सभेत येणार नाही. किंबहुना घालतही नाही; पण तरीही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि काहीही घालू अशा बोंबा मारतात. देशातील महत्त्वाचे मुद्दे सोडून आपण या करोडपती बॉलीवूडच्या मागे लागत आहोत. ज्यांना बघायचेय ते बघणारच आहेत. तुमचे ऐकून कोणी चित्रपट बघायला जाणार नाही का? खरेच इतका वेळ असेल तर त्यांनी देशात होणाऱ्या महागाई, बेरोजगारीविरोधात आवाज उठवला पाहिजे.

निरर्थक मुद्दे उपस्थित करून तुम्ही लोकांचे मनोरंजन करत आहात, असेही काही जण म्हणाले. हिरो- हिरॉईन कोणत्याही धर्माचे असोत; पण चित्रपटातील अंगप्रदर्शन बंद झाले पाहिजे. रंगाचा आणि कपड्यांचा शोध विज्ञानाने संपूर्ण मानव जातीच्या सोईसाठी लावला आहे. त्यावर कोणीही हक्क सांगता कामा नये. उगाच अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असे काहींनी सांगितले.

जेवढा वाद तेवढा लाभ

पठाण रिलीज होण्याअगोदर वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. बेशरम रंग या गाण्यातील बिकीनीच्या रंगावरून टीकाटिप्पणी होऊ लागली आहे. चित्रपटाबाबत आधीच एवढा वाद होणार असेल. तर हीच खरी चित्रपटाची कमाई आहे, असे काही नागरिकांनी सांगितले. जेवढा वाद तेवढा चित्रपट अधिक कमवणार असल्याची प्रतिक्रिया देखील काहींनी दिली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर नागरिक बंदी घालायला जाणार नाहीत. भलतीच लोक जनतेच्या नावाखाली आवाज उठवतील. सामान्य माणूस व्यवस्थित तिकीट काढून चित्रपटाचा आनंद घेईल. त्यामुळे पठाण प्रदर्शित झाल्यावर अधिक कमवेल.

Web Title: Social Trend When the issue of survival is serious, the issue of color is meaningless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.