बेबी डायपरमधून स्मगलिंग...! ६०६ ग्रॅम सोने जप्त, लोहगाव विमानतळावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 16:19 IST2017-12-11T16:13:00+5:302017-12-11T16:19:30+5:30
बेबी डायपरच्या प्रेस बटणामध्ये सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना २-३ ग्रॅमच्या सोन्याच्या रिंगा लावलेल्या आढळून आल्या़. त्याची बाजारातील किंमत सुमारे १८ लाख रुपये आहे.

बेबी डायपरमधून स्मगलिंग...! ६०६ ग्रॅम सोने जप्त, लोहगाव विमानतळावर कारवाई
पुणे : हवाईसुंदरी असलेल्या हेमा मालिनीला दर विमान प्रवासात एक बाहुली पोहोचविण्यासाठी दिली जाते़ त्यातून स्मगलिंग केले जात असते़ पण, त्याची काहीही कल्पना हेमा मालिनीला नसते़ अशीच घटना पुण्यातील लोहगाव विमानतळावर घडल्याचे आढळून आले आहे़
दुबईहून आलेल्या प्रवाशाकडे एकाने बेबी डायपर सोपविले होते़ रविवारी पहाटे दुबईहून स्पाईस जेटचे विमान आले़ या विमानातील प्रवाशाकडील बेबी डायपरविषयी सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आला़ त्यांनी त्याची तपासणी केल्यावर त्याच्या प्रेस बटणामध्ये २-३ ग्रॅमच्या सोन्याच्या रिंगा लावलेल्या आढळून आल्या़ त्यावर रेडियमचे प्लेटिंग करण्यात आले होते़ त्या प्रेस बटणांमध्ये एकूण ६०६ ग्रामचे सोने आणण्यात येत होते़ त्याची बाजारातील किंमत सुमारे १८ लाख रुपये असल्याचे सीमा शुल्क विभागाचे उपायुक्त भारत नवले यांनी सांगितले़
दुबई व अबुधाबीहून येणाऱ्या विमानातून प्रामुख्याने सोन्याची तस्करी मोठ्या प्रमाणावर केली जात आहे़ त्यामुळे पुणे विमानतळावर येणाऱ्या या विमानांची आणि विमान प्रवाशांची कसून तपासणी केली जाते़ त्यातून आजवर अनेक तस्करीची घटना उघडकीस आल्या आहेत़
रेडियम प्लेटिंग करण्याकडे कल
सोन्यावर रेडियम प्लेटिंग केले की स्कॅनिंगमध्ये आतील सोने दिसून येत नाही़ त्याच्यावर नंतर प्रक्रिया केल्यावर संपूर्णपणे सोने परत हाती लागते़ त्यामुळे तस्करी करताना वेगवेगळे माध्यम वापरतानाच त्यावर रेडियम प्लेटिंग करण्याकडे तस्करांचा कल दिसून येऊ लागला आहे.