पिंपरी : विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशय आला आणि १५ दिवसांत सुखी संसाराची राखरांगोळी झाली. पत्नीच्या मोबाइलवर काॅल आला आणि त्यानंतर त्याच क्रमांकावरून ‘झोपू का मग’ असा मेसेज आला. त्यामुळे राग येऊन पतीने सहा वर्षांच्या मुलीसमोरच पत्नीचा खून केला. त्यानंतर स्वत:लाही संपवले. पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली येथे ही धक्कादायक घटना घडली. चिखली पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची फिर्याद नोंद झाली आहे.
कांचन शरद चितळे (२६, रा. रूपीनगर, तळवडे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. शरद रूपचंद चितळे (३३, रा. रूपीनगर, चितळे) असे तिला संपवून आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. कांचन आणि शरद यांचा २०१८ मध्ये विवाह झाला होता. त्यांना सहा वर्षांची परी नावाची मुलगी आहे. रूपीनगर येथे वास्तव्यास असलेल्या या दाम्पत्याचा सुखी संसार सुरू होता. कांचन ‘आशा वर्कर’ तर शरद खासगी कंपनीत कामाला होता.
दरम्यान, कांचनचे विवाहबाह्य संबंध असल्याचा शरद याला १५ दिवसांपासून संशय होता. याबाबत त्याने तिला समजावून सांगितले. नातेवाइकांनाही सांगितले. त्यानंतरही तिच्या वागण्यात फरक पडला नाही. दि. १२ एप्रिल रोजी रात्री तो कंपनीमधून घरी आला. त्यावेळी तिच्या मोबाइलवर एका मोबाइल क्रमांकावरून काॅल आला. त्या क्रमांकावर काॅल करण्यास शरदने सांगितले. मात्र, कांचनने काॅल केला नाही. त्यामुळे त्याने मोबाइल घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने दिला नाही. त्यावरून दोघांत वाद झाला. त्याचवेळी त्याच क्रमांकावरून कांचनच्या मोबाइलवर ‘झोपू का मग’ असा मेसेज आला. त्यामुळे रागातून शरदने तिला मारहाण केली. तिचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून तिला ठार मारून स्वत: मरण्याचा निर्णय त्याने घेतला.
झोपेतच दाबला गळा
दरम्यान, दि. १३ एप्रिल रोजी सकाळी साडेसातच्या कांचन झोपली असताना शरदने तिचा झोपेतच गळा दाबला. नंतर नायलाॅनच्या दोरीने गळा आवळून तिला ठार मारले. त्यानंतर स्वत:देखील नायलाॅनच्या दोरीने पंख्याला गळफास घेण्याचा प्रयत्न केला असता तो बेशुद्ध झाला.
पोलिसांना दिला जबाब
आत्महत्येचा प्रयत्न केल्याने बेशुद्ध झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असताना पोलिसांनी दि. १६ एप्रिल रोजी जबाब नोंदविला. या जबाबात त्याने तिच्या विवाहबाह्य संबंधांबाबत संशय असल्याचे व त्यातूनच तिचा खून करून स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांना सांगितले.
‘पप्पा मम्मीला का मारता? नका मारू’
शरदने कांचनचा गळा दाबला. त्यावेळी सहा वर्षांची मुलगी परी घाबरली. चिमुकल्या परीने रडायला सुरुवात केली. पप्पा मम्मीला का मारता? नका मारू, असे ती म्हणत होती. मात्र, शरदने तिच्या रडण्याकडे आणि बोलण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ती रडतच घराबाहेर गेली.
शेजारच्यांची सतर्कता
परी रडत घरातून बाहेर पडल्याने शेजारची महिला घरात आली. त्यांना शरद पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी आरडाओरडा करून इतरांना बोलावले. त्यावेळी काही नागरिकांनी त्याला खाली उतरवले.