पुणे : सिंहगड टेक्नीकल इन्स्टिट्यूट या शिक्षण संस्थेच्या वडगाव बुद्रुक येथील ४३ आणि काेंढवा येथील ६ मिळकतीच्या कराच्या थकबाकीपोटी महापालिकेच्या मिळकत कर विभागाने संस्थेचे वडगाव येथील कार्यालय मंगळवारी सील केले. या संस्थेच्या शहरात एकूण १२८ मिळकतींचा ३४५.४३ काेटी रुपये मिळकत कर थकल्याची माहिती मिळकतकर विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.
सिंहगड टेक्नीकल इन्स्टिट्यूट या शिक्षण संस्थेच्या शहरात विविध ठिकाणी मिळकती आहेत. या मिळकतींच्या करासंदर्भात महापालिका व संस्था यांच्या न्यायालयात वाद सुरू आहेत. संस्थेच्या १२८ मिळकतींचा तब्बल ३४५.४३ कोटी मिळकत कर थकलेला आहे. त्यामुळे महापालिकेच्या मिळकत कर विभागाने ज्या मिळकतीसंदर्भात न्यायालयाचे आदेश नाहीत, अशा मिळकतींवर कारवाई करण्याची मोहिम हाती घेतली आहे. यापूर्वी एरंडवणा येथील संस्थेचे मुख्य कार्यालय ४७.४३ कोटीच्या थकबाकीपोटी महापालिकेने सील केले आहे. लवकरच या मिळकतीच्या लिलावाची प्रक्रीया सुरू करण्यात येणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.
यानंतर आता मिळकतकर विभागाने सिंहगड संस्थेच्या वडगाव बुद्रुक येथील ४३ मिळकतींच्या १९८.६१ कोटीच्या थकबाकीपोटी मंगळवारी येथील संस्थेचे कार्यालय सील करण्यात आले. याशिवाय संस्थेकडे काेंढवा येथील ६ मिळकतीची २०.५० कोटी रुपये मिळकत कराची थकबाकी असल्याचे जगताप यांनी सांगितले. यापुर्वी न्यायालयाने दिलेल्या आदेश देवूनही संस्थेने कराची रक्कम भरली नाही, त्यामुळे महापालिकेने अवमान याचिकाही दाखल केली आहे.
-- एरंडवणा येथील मिळकतीची २००९ सालापासून थकबाकी आहे, तर वडगाव बुद्रुक येथील मिळकतींची २००२ आणि काेंढवा बुद्रुक येथील मिळकतींची २००८ सालापासून थकबाकी आहे.
-- शहरातील एकूण ४३८ शासकीय मिळकतींची ९३.२४ कोटी इतकी थकबाकी आहे. याबाबत सदरची थकबाकी वसूल करणेबाबत शासकीय मिळकत धारकांकडे पाठपुरावा सुरु आहे.
-- शहरातील टॉप १०० थकबाकीदार मिळकत धारकांची ३३४.१० कोटी इतकी थकबाकी आहे. सर्वाधिक करथकबाकी फुरसुंगीचे संतोष काटेवाल यांची १८ कोटी ४४ लाख ३७ हजार ५८५ रुपये इतकी थकबाकी आहेत.
मिळकत कर थकबाकी वसुलीसाठी वसुली मोहिम राबवण्यात येत आहे. ज्या मिळकत धारकांनी अद्यापही कर भरलेला नाही, त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. सिंहगड इन्स्टिट्युटच्या मालमत्ता थेट सील केल्या जात नाही. तर त्यांच्या मुख्य कार्यालयांना सील ठोकण्यात आले आहे. शाळा, कॉलेज असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. - माधव जगताप, उपायुक्त, मिळकत कर विभाग, महापालिका.