बावडा : निर -निमगाव (ता. इंदापूर )चौक येथे संत सोपानकाका महाराज पालखी सोहळा इतिहासात प्रथमच रथातून नवीन बांधलेल्या पालखी कट्ट्यावर या परिसरातील भाविकांच्या दर्शनासाठी एक तास विसावली. यावेळी निर-निमगाव रत्नप्रभादेवीनगर, पिठेवाडी परिसरातील भाविकांनी हालगी व टाळ मृदुंगाच्या तालावर पालखी घेऊन पाऊल खेळ खेळून आनंद घेतला. यावेळी समस्त ग्रामस्थ निर निमगाव यांच्या वतीने दत्तात्रय घोगरे यांनी सोहळा प्रमुख विश्वस्त त्रिगुण महाराज गोसावी यांचा सन्मान केला. सोहळा प्रमुख श्रीकांत गोसावी, चोपदार मनोज रनवरे, सिद्धेश शिंदे तसेच पालखी सोहळ्यातील इतर विश्वस्तांचा व मानकऱ्यांचा सन्मान ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.
सर्व पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना निरनिमगाव ग्रामस्थांच्या वतीने बाजरीची भाकरी, मिरचीचा ठेचा, झुणका, हरभऱ्याची भाजी इत्यादी मेनू अन्नदान म्हणून वाटप करण्यात आले. तसेच आजूबाजूच्या पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्तांनी आपापल्या परीने अन्नदानाची सेवा केली. संत सोपान काका महाराज यांच्या पालखीचे स्वागत समस्त ग्रामस्थ निरनिमगाव व चौकाच्या पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी तसेच अनंतराव पवार प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी व वारकऱ्यांच्या वेशभूषेत आषाढी वारी दिंडी च्या माध्यमातून दिंडीत सहभागी होऊन स्वागत केले. याप्रसंगी आरोग्यवर्धिनी उपकेंद्र निर निमगाव यांच्या वतीने आरोग्य तपासणी व उपचार देण्यात आले. या पालखी सोहळ्याच्या स्वागतात अनंतराव पवार विद्यालय, अनंतराव पवार प्राथमिक विद्यालयातील शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनीही सहभाग घेऊन परिश्रम घेतले.
संत सोपान काका महाराज यांची पालखी निरनिमगाव चौकात पहिल्यापासून रथामध्येच थांबत होती. परंतु एक वर्षांपूर्वी या चौकातील एका शेतकऱ्यांनी सोपान काका महाराज पालखी रथातून खाली दर्शनासाठी विसावली पाहिजे. म्हणून गुप्त स्वरूपात दान म्हणून पालखी स्थळासाठी जमीन दिली. म्हणूनच आज इतिहासात प्रथमच पालखी पालखी कट्ट्यावर विसावली. - संत सोपान काका पालखी प्रमुख विश्वस्त त्रिगुण महाराज गोसावी.