श्रीराम पथकाचे अयोध्येत होणार ढोल-ताशा वादन, पुण्यात रविवारी वाद्यपूजन सोहळ्याचे आयोजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 20:13 IST2024-01-11T20:10:48+5:302024-01-11T20:13:41+5:30
श्री रामजन्मभूमी न्यासाकडून श्रीराम पथकाला अयोध्या येथे ढोल-ताशा वादन करण्याचे आमंत्रण मिळाले...

श्रीराम पथकाचे अयोध्येत होणार ढोल-ताशा वादन, पुण्यात रविवारी वाद्यपूजन सोहळ्याचे आयोजन
पुणे : पुण्यातील श्रीराम पथक येत्या २२ जानेवारी रोजी आयोध्येत होत असलेल्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात वादन होणार आहे. पुणेकरांबरोबर साजरा करण्यासाठी रविवारी (दि. 14) वाद्यपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती विलास शिगवण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री रामजन्मभूमी न्यासाकडून श्रीराम पथकाला अयोध्या येथे ढोल-ताशा वादन करण्याचे आमंत्रण मिळाले आहे. महाराष्ट्राच्या, पुण्याच्या संस्कृतीचे अयोध्येत प्रदर्शन करून श्रीराम पथक ढोलताशा वादनाने रामलल्लाच्या चरणी आपली सेवा अर्पण करणार आहे. याचबरोबर पथकाला काशी विश्वेश्वर येथील मंदिराच्या परिसरातही वादन करण्याची संधी देण्यात आली आहे.
यामध्ये ५० ढोल २५ ताशा आणि ध्वज पथक असणार आहे. यावेळी पथकाचे १५० सभासद जाणार असून यामध्ये वयवर्षे १८ ते ५० चा समावेश आहे. तसेच हा आनंद पुणेकरांसोबत साजरा करण्यासाठी रविवार(दि.१४) रोजी सायंकाळी सहा वाजता पथकाने जाहीर वाद्यपूजन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथे केले असून यासाठी प. पू. शंकराचार्य विद्यानृसिंहभारती (स्वामी संकेश्वर पीठ) यांच्या हस्ते वाद्यपूजन होणार आहे. तसेच पुणेकर नागरिकांनीही मोठ्या संख्येने या सोहळ्याला आपली उपस्थिती नोंदवावी, असे आवाहन पथकातर्फे करण्यात आले आहे.