पुणे : ऑनलाइन गेमिंगच्या वेडात आणि हत्यार दाखवण्याच्या हट्टात पुण्यात थरारक घटना घडली आहे. मोबाईलवर पबजी खेळताना पिस्तूल लोड-अनलोड करत असताना गोळी सुटून एक तरुण जखमी झाला आहे. ही धक्कादायक घटना पुण्यातील उत्तमनगर परिसरात काल (रविवार, ३ ऑगस्ट) रात्री उशिरा घडली. ही घटना गुप्त ठेवण्यासाठी तरुणांनी बनाव करून पोलिसांना खोटी माहिती दिली. मात्र पोलिसांच्या सतर्क तपासात सर्व वास्तव उघडकीस आले असून, पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
काय घडलं नेमकं?
उत्तमनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मोहन खंदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच तरुण मित्र त्यांच्या एका मित्राच्या घरी एकत्र जमून PUBG मोबाईल गेम खेळत होते. यावेळी त्यांच्यातील एकाने त्याच्याकडे असलेले पिस्तूल इतरांना दाखवायला सुरुवात केली. रात्री सुमारे १.३० वाजता या तरुणाने पिस्तूल लोड-अनलोड करत असताना अचानक गोळी सुटली. समोर बसलेल्या मित्राच्या पायाच्या नडगीतून गोळी आरपार गेली, त्यामुळे तो गंभीर जखमी झाला.
खोटी माहिती देऊन बनाव
घटना कोणालाही कळू नये म्हणून जखमी तरुणाने स्वतःच पोलिसांना कॉल करून "आपल्यावर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार झाला" अशी खोटी तक्रार दिली. मात्र उत्तमनगर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून केलेल्या सखोल चौकशीत या तरुणांचा बनाव उघड झाला.
पिस्तूल जप्त, सर्वजण ताब्यात
घटनेनंतर पोलिसांनी सर्व पाच तरुणांना ताब्यात घेतले असून, गोळी झाडणाऱ्या तरुणाकडून पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. हे पिस्तूल त्याच्याकडे कोणत्या मार्गाने आले, याचा तपास सुरू आहे.